आमदार शेळकेंनी दोन कोटींचा मंजूर निधी मिळू दिला नाही : भाजप झेडपी सदस्याचा आरोप 

खोटेनाटे आरोप करणे व जाणीवपूर्वक विकास कामांना खीळ घालणे या बाबी मावळच्या परंपरेत बसत नाहीत.
आमदार शेळकेंनी दोन कोटींचा मंजूर निधी मिळू दिला नाही : भाजप झेडपी सदस्याचा आरोप 
BJP's ZP member Nitin Marathe accuses MLA Sunil Shelke

इंदोरी (जि. पुणे)  ः मावळ तालुक्यातील वराळे गावास राजकीय भावनेतून विकास कामांमध्ये जाणीवपूर्वक त्रास देण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी करु नये, असे आवाहन वराळे गावचे माजी सरपंच तथा भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य नितीन मराठे, सरपंच मनीषा शिंदे व उपसरपंच विशाल मराठे यांनी पत्रकार परिषदेत केले. (BJP's ZP member Nitin Marathe accuses MLA Sunil Shelke)

कथित भ्रष्टाचाराची उदाहरणे देताना आमदार सुनील शेळके यांनी ४८ लाख खर्चाच्या विहिरीबाबत शंका घेऊन विहिर ग्रामपंचायतीने दाखवावी असा बिनबुडाचा, खोटा व गावाची बदनामी करणारा आरोप केला होता. त्या आरोपाचे झेडपी सदस्य मराठे, सरपंच मनीषा शिंदे यांनी खंडन केले. आमदार शेळके यांनी केलेल्या आरोपांबाबत जिल्हा परिषद व राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. 

वराळे गावच्या हद्दीत ४८ लाख रुपयांच्या विहिरीचे कामच झालेले नाही. ग्रामपंचायत निधीतून ४१ लाख खर्चाची पूरक पाणी योजना मंजूर होऊन विहिर, पाइपलाइन, पंपहाऊस, मोटारपंपसह एकूण ४१ लाख ३ हजार रुपये खर्च झालेला आहे. पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे. तसेच, आमदार शेळके यांनी वराळे गावात १३ दलित वस्त्यांबाबत शंका घेऊन दलित बांधवांचा अपमान केल्याचा आरोप ही या वेळी करण्यात आला.

दर पाच वर्षांनी बह्‌त आराखडा समाजकल्याण विभागाकडून तयार करुन दलीत वस्त्या निश्चित करतात. त्यानंतर समाजकल्याण विभागाचे आयुक्त मंजुरी देतात. सन २०१७-१८ मध्ये गावची लोकसंख्या २० हजाराच्यावर होती आणि १३ दलित वस्त्यांची नोंद आहे. यापेक्षाही अधिक दलित वस्त्या पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत असल्याचेही पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. या उलट दलितवस्त्यांसाठी मंजूर झालेला दोन कोटींचा निधी आमदार शेळके यांनी मिळू दिला नसल्याचा आरोप करण्यात आला. हा निधी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाला नाही, तर तो जाणार कुठे, असा प्रतिप्रश्न मराठे यांनी केला. 

आमदारांनी खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करू नये व वैचारिक पातळी ढळू देऊ नये. मावळची परंपरा पक्षविरहित काम करण्याची असून विकासकामांना प्राधान्य देण्याची आहे. आजपर्यंतच्या मावळातील सर्व राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधींनी सुसंस्कृत परंपरेचे पालन करुन मावळचा विकास केलेला आहे.

खोटेनाटे आरोप करणे व जाणीवपूर्वक विकास कामांना खीळ घालणे या बाबी मावळच्या परंपरेत बसत नाहीत, असा सल्लाही या पत्रकार परिषदेत आमदार शेळके यांना देण्यात आला. पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पारगे, अमृता मराठे, प्राजक्ता राजगुरु हेही उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in