राज्यात लोकसभेच्या पाच खुल्या जागांवर भाजप SC, ST उमेदवार देणार

आदिवासींसाठी भाजप सर्वाधिक काम करत असल्याचा दावा...
राज्यात लोकसभेच्या पाच खुल्या जागांवर भाजप SC, ST उमेदवार देणार
Chandrakant Patil

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाच खुल्या जागांवर एससी, एसटी प्रवर्गाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा गौरव दिन म्हणून राज्य सरकार साजरा करेल ना करेल, पण भाजप, मात्र त्यांची आगामी जयंती (१५ नोव्हें.) गौरव दिन म्हणून साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानिमित्त पक्षाचे लाखो कार्यकर्ते आपल्या घरात बिरसा मुंडा यांचा फोटो लावून त्यांना नमन करतील, असे त्यांनी जाहीर केले.

भाजपच्या प्रदेश अनुसूचित जनजाती तथा आदीवासी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकनिमित्त भोसरीत आयोजित मेळाव्यात चंद्रकांतदादा बोलत होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उदघाटन केलेल्या या मेळाव्याचा चंद्रकांतदादांच्या हस्ते समारोप झाला. शहराच्या महापौर माई ढोरे, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री डॉ.प्रा. अशोक ऊईके, शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे,पूजा लांडगे,स्थानिक नगरसेवकांसह राज्यातील आदीवासी आमदार,खासदार यावेळी व्यासपीठावर होते.

काही फेक आदीवासींनी मिळविलेल्या सरकारी नोकऱ्या आणि आपले आरक्षण काढून घेतले जात असल्याचा सध्या निर्माण करण्यात येत असलेला भ्रम हे प्रश्न घेऊन आदीवासींनी संघर्ष केला पाहिजे,असे चंद्रकांतदादा म्हणाले. वनपट्टे आणि आदीवासी मुलांचे शहरातील नामांकित शाळेतील शिक्षण या दोन महत्वाच्या योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे पडत चालल्या असून त्याप्रश्नीही मुंबईत मोठा मोर्चा काढण्याच्या सूचना त्यांनी या वेळ केल्या.

कुठलीही मागणी आंदोलनाशिवाय मान्य न करणारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे गेंड़्याच्या कातडीचे असल्याची टीका पाटील यांनी केली. आंदोलनानंतर सुद्धा हे सरकार मागणी करीत नाही, हे वीजबिल प्रश्नांवरून दिसून आल्याचे त्यांनी म्हटले. 

फडणवीस यांची टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी समाजाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. भाजपाच्या काळात खावटीचे कर्ज रद्द केले होते. सुमारे १७५ कोटी रुपयांचे आदिवासी बांधवांवरील कर्ज आम्ही माफ केले होते. पण, आताच्या सरकारचे खावटीबाबत धोरण काय आहे? आदिवासींच्या खात्यात ४ हजार रुपये जमा करण्याची योजना असताना, सरकारने वस्तू खरेदी करुन आदिवासी बांधवांना देवू, अशी भूमिका घेतली. महाविकास आघाडीला खरेदीमध्ये स्वारस्य आहे. चुकीचा माल खरेदी करु आणि मलिदा लाटू, अशी भूमिका सरकारची आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले की  ज्यात भाजपाचे सरकार असताना आदिवसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. आदिवासी मुलांसाठी सेंट्रलाईज किचन, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतून गणवेश, शैक्षणिक साहित्य, राहण्याची व्यवस्था आदीसाठी मदत, पेसा ग्रामपंचायत निर्णयामुळे आदिवासी गावांचा विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अनेक योजना भाजपने सुरू केल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in