जादा कोरोना लशीसाठी भाजप आमदाराने घातले जावडेकरांना साकडे
Laxman Jagtap .jpg

जादा कोरोना लशीसाठी भाजप आमदाराने घातले जावडेकरांना साकडे

जावडेकरांच्या खात्याशी सबंधित हा प्रश्न नसला, तरी ते पुणेकर असल्याने केंद्रीय मंत्री म्हणून या मागणीची पूर्तता ते नक्की करतील

पिंपरी : कोरोना रुग्णांची दररोज झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा आणि जिल्ह्यातील रुग्णालयांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या व्हेंटिलेटरचा वेळेत पुरवठा करावा, अशी अशी मागणी चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे गुरुवारी पत्राव्दारे केली.

जावडेकरांच्या खात्याशी सबंधित हा प्रश्न नसला, तरी ते पुणेकर असल्याने केंद्रीय मंत्री म्हणून या मागणीची पूर्तता ते नक्की करतील,असा विश्वास जगताप यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. जावडेकर यांना केलेल्या मेलमध्ये जगताप म्हणतात, महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यातही पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात ती चिंताजनक आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांत कोरोना चाचण्या आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर दोन्ही पालिकांच्या मार्फत कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक करण्याची गरज आहे. 

त्याकरिता मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या लसीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे केंद्राकडून पुणे जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून द्यावा आणि व्हेंटीलेटरचा वेळेत पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आपण आदेश द्यावेत, असे म्हटले आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी ( ता.१४ एप्रील) तब्बल ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, एक हजार ५१७ नवे रुग्ण आढळले. पुणे शहरात चार हजार २०६ नव्या रुग्णांची आणि ४६ मृत्यूंची भर पडली. तर, एकूण जिल्ह्यात सात हजार ८८८ नवे रुग्ण सापडले असून या साथीने ९४ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बळींचा आकडा ११ हजाराच्या घरात (१० हजार ९८९) गेला आहे.जिल्ह्यातील ही एकूण रुग्णसंख्या सहा लाख ८६ हजार १४ वर गेली असून त्यातील पाच लाख ६८ हजार जण बरे झाले आहेत. बाकीचे ९७ हजार ७१२ हे उपचार घेत असून त्यातील तब्बल ७४ हजार ८५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in