पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची गळती सुरुच... आणखी एक नेता राष्ट्रवादीत

भाजपचा महापालिकेमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर पक्षातून झालेली ही पहिली गळती आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची गळती सुरुच... आणखी एक नेता राष्ट्रवादीत
Ajit Pawar.jpg

पिंपरीः गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड (PCMCl), भाजपला (BJP),लागलेली गळती या महिन्यातही सुरुच आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेविका माया बारणेंचे पती संतोष बारणे हे आज (ता.९) राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये  (NCP) दाखल झाल्याने शहर भाजपला धक्का बसला आहे. शहराच्या थेरगाव भागात बारणेंचे मोठे प्रस्थ आहे. तेथून बारणे दांपत्याने नगरसेवक म्हणून निवडून येण्याची हॅटट्रिक केलेली आहे.

 
भाजपचा मपालिकेमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर पक्षातून झालेली ही पहिली गळती आहे. याच मुद्यावरून भाजप सोडल्याचे संतोष बारणे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले. गेल्या साडेचार वर्षात महापालिकेत झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार यामुळे एका काळी आशिया खंडात श्रीमंत पिंपरी पालिकेची बदनामी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष अखेरीस भाजपमधून आणखी `आऊटगोईंग` होईल, असेही भाकित त्यांनी केले.

बारणे यांच्या नगरसेविका पत्नी माया यांनी याअगोदरच भाजपच्या कार्यक्रमांना जाणे थांबवले असल्याने त्या ही आपला टर्म संपताच पक्ष सोडतील, अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा :राणेंचं पत्र आलं अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ४८ तासांतच कार्यवाही 

गेल्या महिन्यात (ता.२०) चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव भागातील त्यांचे कट्टर समर्थक, माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली. त्यांच्या पत्नी चंदा या महिला व बालकल्याण समितीच्या विद्यमान सभापती आहेत. त्या ही टर्म संपताच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. बारणेंनी मुंबईत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली.यावेळी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते. 

हेही वाचा : वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

गतवेळी २०१७ ला भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपला पंधरा दिवसांतच हा दुसरा धक्का आहे. दुसरीकडे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील पक्षाच्या दोन नगरसेवकाचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.याआधी १९ मे रोजी भाजपच्या शहर ओबीसी महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सारिका पवार यांनी गेल्यावर्षी एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करताच राष्ट्रवादीत प्रवेश करत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in