भाजपच्या सभागृह नेत्याने आपल्याच नगसेविकेचा केला निषेध

पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या शहराचा व त्यातून रहिवाशांच्या होत असलेल्या कुचंबणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 Asha Dhayagude .jpg
Asha Dhayagude .jpg

पिंपरी : पावसाळ्यात सणासुदीच्या तोंडावर प्रभागात खोदकाम करून रहिवाशांची गैरसोय केल्याच्या निषधार्थ पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या केबिनबाहेर सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगेंसह (Asha Dhayagude) महिलांनी गुरुवारी (ता.९) गोंधळ घातला. यावेळी त्यांनी आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासल्याने मोठा गोंधळ उडाला. परिणामी तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा पोलिसांना पालिकेत यावे लागले. त्यांनी शेंडगेंसह दहा महिलांना ताब्यात घेतले आहे.  

यामुळे पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या शहराचा व त्यातून रहिवाशांच्या होत असलेल्या कुचंबणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्व शहरातच सध्या सांडपाणी वाहिनी, जलवाहिनीची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी ती झाली आहेत. मात्र, इतरत्र त्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. कॉंक्रीटीकरणासाठीही शहरभरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यातही स्मार्ट सिटीची कामे सुरु असलेल्या भागात नागरिक, तर त्या कामामुळे गेल्या दोन वर्षापासून पूरते वैतागून गेले आहेत.

दरम्यान, आपल्याच नगरसेविकेच्या या कृत्याचा निषेध करण्याची पाळी भाजपचे सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यावर आज आली. हे निंदनीय कृत्य असून त्यावर चर्चेतून मार्ग काढता आला असता, असे ते 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. पालिका कर्मचारी महासंघानेही याचा निषेध केला आहे. ते निषेध सभाही घेणार आहेत. एकूणच संतप्त रहिवाशी व त्यातही महिला या तयारीनिशी पालिकेत आल्याचे दिसून आले आहे. त्यातून त्यांचा आयुक्तांना, तर काळे फासण्याचा विचार नव्हता ना अशीही चर्चा पालिकेत ऐकायला मिळाली. 

गेल्या महिन्यात (ता.१८) पोलिसांनी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग-एसीबी) पालिकेच्या स्थायी समितीवर धाड टाकली होती. त्यावेळी एक लाख १८ हजाराची लाच घेताना स्थायी समितीचे भाजपचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व स्थायीच्या चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. त्यात हे सर्वजण ३० तारखेला जामीनावर सुटले. हे प्रकरण थंड होतो न होते तोच आज पुन्हा सत्ताधारी नगरसेविकेमुळेच पोलिसांना पुन्हा पालिकेत यावे लागले. त्यांना कारवाई करावी लागली. गतवेळी ती स्थायी समिती चेंबर असलेल्या पालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर झाली होती. आज ती आयुक्त दालन असलेल्या चौथ्या मजल्यावर करण्यात आली.

शिक्षिका असलेल्या शेंडगे या अभ्यासू नगरसेविका (प्रभाग क्र. ३० ब, कासारवाडी) म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रभागात स्मार्ट सिटीअंतर्गत गेल्या वर्षभरापासून कामे सुरु आहेत. गेल्यावर्षीच्या हरतालिका सणाच्या वेळी म्हणजे गणेशोत्सवाच्या तोंडावर ते सुरु होते. पावसाळ्यात खोदकाम करू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीही तो धुडकावून सध्या शहरभर खोदाई सुरुच आहे. शेंडगे यांच्या प्रभागातही भूमिगत गटाराचे काम स्मार्ट सिटीत सुरु आहे. हरतालिका व गणपतीच्या तोंडावर ते करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. 

कारण त्यामुळे रहिवाशांची पावसाळ्यात मोठी कुचंबणा होत होती. त्यांचाही त्याला विरोध होता. मात्र, ते न ऐकता हे काम प्रशासनाने सुरुच ठेवले होते. बुधवारपासून (ता.८) तर पोलिस बंदोबस्तात ते सुरु होते. त्यामुळे रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. ते व त्यातही महिला आज शेंडगेच्या नेतृत्वात पालिकेत आले. त्यांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या मांडला. त्यावेळी केबिनमध्ये जाण्यासाठी आलेले आयुक्त त्यांना ओलांडून आत गेले. त्यामुळे त्याचा राग त्यांनी त्यांच्या नेमप्लेटवर काढला.     

     

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com