महेश लांडगेंविरोधात भोसरीतूनच बंड : शिक्षक पुरस्कारावरून भाजप नगरसेविकेचा हल्ला

आगामी निवडणुकीत पुन्हा तिकिट मिळाले नाही, तर अनेक वाटा आहेत.
BJP corporator Priyanka Barse criticizes Mahesh Landge over teacher award
BJP corporator Priyanka Barse criticizes Mahesh Landge over teacher award

पिंपरी : कोरोना काळात राज्य सरकारने गेली दोन वर्षे शिक्षकदिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेले नाहीत. त्यावरून भोसरीचे भाजपचे आमदार व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी हे पुरस्कार बंद करताना आघाडी सरकारला खंत कशी वाटली नाही, अशी टीका काल (ता. ४) शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला केली होती. त्यांना भोसरीतूनच भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आज (ता. ५) शिक्षकदिनी  घरचा आहेर दिला आहे. गेल्या साडेचार वर्षांत कुठलेही पद न मिळालेल्या व मुख्याध्यापक असलेल्या बारसे यांनी शिक्षण समितीचे सभापतिपद देण्याची मागणी लांडगे यांच्याकडे केली होती. मात्र, ते न दिल्याने राज्य सरकारने शिक्षकांना पुरस्कार दिलेला नाही, अशी खंत व्यक्त करण्याचा लांडगे यांना कोणताही अधिकार नाही, अशा शेलक्या शब्दांत बारसे यांनी आमदारांना सुनावले आहे. (BJP corporator Priyanka Barse criticizes Mahesh Landge over teacher award)

गेल्या साडेचार वर्षांत एकही पद न मिळालेले व स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छूक असलेले भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे यांनी यापूर्वी आपल्या वाढदिवशी (१५ ऑगस्ट) लावलेल्या फ्लेक्सवर भाजप नेत्यांऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो टाकून पक्षाला घरचा आहेर दिला होता. सभापतिपद न दिल्याने त्यांनी नाराज होऊन स्थायीच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे. तर, भोसरीतीलच भाजपचे दुसरे नगरसेवक संजय नेवाळे यांच्याही वाढदिवसानिमित्त (१२ ऑगस्ट) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांचा सत्कार केल्याने या दोन्ही वाढदिवसांची भोसरीतच नाही, तर संपूर्ण शहरात गेल्या महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाजपला भोसरीतूनच घरचा आहेर बारसे यांनी दिला आहे.

दरम्यान, टर्म पूर्ण होईपर्यंत पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. पक्ष का सोडायचा, अशी उलट विचारणा त्यांनी केली. मात्र, आगामी निवडणुकीत पुन्हा तिकिट मिळाले नाही, तर अनेक वाटा आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

शिक्षक पुरस्कार दोन वर्षे जाहीर न करणाऱ्या राज्य सरकारवर टीका करणारी `बैलगाडा शर्यतीनंतर आमदार महेश लांडगे यांची आता शिक्षकांसाठी बॅटिंग` अशा मथळ्याची बातमी ‘सरकारनामा’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा आधार घेत बारसे यांनी लांडगेंना लगेचच आज घरचा आहेर दिला. त्यामुळे शिक्षकांसाठी बॅटिंग करणाऱ्या लांडगेंना त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेने त्रिफळाचित केल्याची चर्चा भोसरीत रंगली होती. 

बारसे या मुख्याध्यापिका आहेत. शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्याने पालिकेच्या शिक्षण समितीचे सभापतिपद देण्याची मागणी त्या सातत्याने पक्षाकडे आणि पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लांडगे यांच्याकडे गेली साडेचार वर्षे करत आहेत. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, पालिका निवडणुकीला सहा महिने राहिले आहेत. आता तरी मला संधी द्या. अशा मागणीचे पत्र शहराध्यक्ष आमदार लांडगे यांना पुन्हा महिनाभरापूर्वी दिले. तरीही मला  संधी दिलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिलेला नाही, अशी खंत व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार महेश लांडगेंना नाही.’’
           
पालिकेत नात्यागोत्याचे राजकारण सुरु असून प्रामाणिक काम करणाऱ्या नगरसेवकांना न्याय मिळत नाही. त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या समस्या पक्षाच्या वरीष्ठांपर्यंत पोचवल्या जात नाहीत, अशी तोफही बारसे यांनी डागली. शिक्षण सभापतिपद एक-एक वर्षासाठी देण्याचे ठरलेले असतानाही सोनाली गव्हाणे यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आला. मनिषा पवार, तर दोन वर्षाहून अधिक काळ या पदावर आहेत. त्यांना पद सोडण्यास सांगण्यात आलेले नाही. कोरोना काळामध्ये त्यांना कोणत्याही योजना राबवता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना काहीही मिळाले नसल्याने त्यांना कायम ठेवले आहे, असे अजब कारण पक्षाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिल्याची माहिती बारसे यांनी दिली. शहराला बापाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com