पिंपरी स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगेंना अडकवल्याचा भाजपचा दावा  - BJP claims to have cheated Nitin Landage-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पिंपरी स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगेंना अडकवल्याचा भाजपचा दावा 

उत्तम कुटे
गुरुवार, 19 ऑगस्ट 2021

नितीन लांडगे बळीचा बकरा ठरलेत आणि दरोडेखोर सुटून चोर फसला, अशी चर्चा आहे.

पिंपरी : मितभाषी, प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे समजले जाणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे हे लाचखोरीत सापडल्याने त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ते बळीचा बकरा ठरलेत आणि दरोडेखोर सुटून चोर फसला, अशी चर्चा त्यांच्या हितचिंतकांसह पालिकेच्याही वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान, खुद्द भाजपलाही या कारवाईविषयी शंका वाटत असून अॅड. लांडगेंना या प्रकरणात अडकवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी त्यातील सत्य शोधण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

खुर्ची तथा पद भोवले, अशी चर्चा लांडगेंच्या समर्थकांत एसीबीच्या कारवाईनंतर ऐकायला मिळाली आहे. शेवटच्या वर्षी स्थायीचे अध्यक्ष म्हणून तसे ते उत्सुकही नव्हते. इतरांचीच नावे त्यासाठी घेतली जात होती. भोसरीतीलच बिनविरोध निवडून आलेले भाजपचे रवी लांडगे यांचे नाव त्यासाठी आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी भाजपने आपल्या धक्कातंत्रानुसार अॅड. लांडगेंना पाच महिन्यांपूर्वी ५ मार्चला संधी दिली अन् त्यामुळेच त्यांना हा जोर का धक्का, जोर से बसला. 

न्यायमूर्ती चांदीवाल समितीनं परमबीर सिंग यांना  ठोठावला २५ हजारांचा दंड
त्यानी तोंड उघडले, तर स्थायीतील भाजपचेच नाही, तर राष्ट्रवादीसह शिवसेनेचे सदस्यही अडचणीतही येण्याची शक्यता आहे. कारण स्थायीला ठेकेदारांकडून मिळणारा टक्का हा सदस्यांतही वाटला जात असल्याची खुली चर्चा व उघड गुपित आहे. दरम्यान, अॅड. लांडगेंचा राजीनामा पक्ष घेण्याची शक्यता असून त्यामुळे पुन्हा स्थायीला नवा अध्यक्ष काही महिन्यांसाठी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. एकूणच या प्रकरणामुळे भाजपच नाही, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही घडामोड होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

माधुरी मिसाळ उद्या पिंपरीत  
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी आणि पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची अॅड. लांडगेवरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी लगेचच नियुक्ती केली आहे. ॲड. लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत असल्याचा दावा भाजपने आज केला आहे. या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी आमदार मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. त्या उद्या (ता.२०) पिंपरी-चिंचवडला येणार असून, सर्वांची भेट घेऊन यामागचे सत्य जाणून घेतील. नंतर आपला अहवाल त्या प्रदेशाध्यक्षांना देणार आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात असून त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत.  मात्र, आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असे चंद्रकांत पाटील या प्रकरणावर बोलले आहेत. 
Edited by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख