राष्ट्रवादीची फसलेली योजना भाजपच्या कारभाऱ्यांनी पुन्हा आणली  

त्यानंतरही कचऱ्याचे पूर्णपणे विलगीकरण होऊन तो गोळा केला गेला नाही.
राष्ट्रवादीची फसलेली योजना भाजपच्या कारभाऱ्यांनी पुन्हा आणली  
pcmc .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे कारभारी स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य आणि पक्षनेत्यांनी मध्य प्रदेशातील इंदूरचा पंधरा दिवसांपूर्वी खासगी दौरा केला. दौऱ्यात तेथील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार संस्थेलाच पिंपरी-चिंचवडचाही कचरा विलगीकरण करून तो गोळा करण्याचा ठेका गुरुवारी (ता. २२ जुलै) स्थायी समितीने दिला. शहरातील चार प्रभागातील हे काम सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण शहराचे ते दिले जाणार आहे. त्यातून शहर कचराकुंडीमुक्त आणि कचराडेपोमुक्त करणार असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landage) यांनी केला आहे. (BJP brought back the failed plan of NCP) 

दरम्यान, यापूर्वीही भाजपच्या वरील दाव्यासारखाच दावा करून घरटी दोन अशा कोट्यवधी रुपयांच्या डस्टबीन शहरात राष्ट्रवादीची सत्ता असताना वाटण्यात आल्या  होत्या. त्यानंतरही कचऱ्याचे पूर्णपणे विलगीकरण होऊन तो गोळा केला गेला नाही. त्यामुळे शहर कचरामुक्त करण्याचा दावा फोल ठरला. त्यामुळे आता भाजपनेही तसाच दावा पुन्हा केल्याने त्यावर साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे हे ठेके तथा कामे फक्त टक्केवारीसाठीच दिली जातात का अशी चर्चा पालिका वर्तुळात आता ऐकायला मिळाली आहे.

प्रायोगिक तत्वावर घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरातील चार प्रभागांची निवड करण्यात आल्याचा ठराव गुरुवारच्या (ता.२२) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. शहराच्या दोन भाजप कारभारी आमदारांपैकी चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांना त्यात झुकते माप मिळाले आहे. कारण चारपैकी त्यांच्या मतदारसंघातील २८ आणि २९ असे दोन प्रभाग या योजनेत घेण्यात आले आहेत.

दुसरे कारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील एक (क्र.७) आणि शहरातील तिसऱ्या पिंपरी या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मतदारसंघातील एक (क्र.१५) असे इतर दोन प्रभाग हे प्रथम कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घेण्यात आले आहेत. प्रभाग १५ हा विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांचाही आहे. तेथे एक नगरसेवक शिवसेनेचे अमित गावडे असल्याने विरोधी पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध करू नये, म्हणून त्यांच्या प्रभागाची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. 

विकासकामांत भोसरी व चिंचवडच्या तुलनेत पिंपरीवर आतापर्यंत पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून नेहमीच अन्याय करण्यात आला असल्याची तेथील रहिवाशांची भावना आहे. प्रभाग १५ मध्ये बाकीचे दोन नगरसेवक भाजपचे असून त्यात माजी उपमहापौर शैलजा मोरे आहेत. तर, प्रभाग सात हा स्थायी समिती अध्यक्षांचाच असून त्यात स्थायीचे माजी अध्यक्षही नगरसेवक आहेत. तर, चिंचवडमधील प्रभाग २८ हा स्थायी समिती सदस्य व आमदार जगतापांचे पाठीराखे नगरसेवक शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे आणि माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांचा आहे. तर प्रभाग २९हा सुद्धा आजी, माजी स्थायी समिती सदस्यांचाच आहे.

पक्षनेते नामदेव ढाके, स्थायीचे अध्यक्ष अॅड लांडगे व इतर काही सदस्यांनी मागील पंधरवड्यात इंदोरचा दौरा केला होता. हा आपला खासगी दौरा असल्याचे स्थायीचे अध्यक्ष व पक्षनेत्यांनीही त्यावेळी सांगितले होते. एका परिचिताच्या लग्नाला इंदूरला गेल्याचे अध्यक्ष म्हणाले होते. इंदोर शहरातील कचरा व्यवस्थापन मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स ही संस्था करते. तिलाच पिंपरी पालिकेच्या चार प्रभागातील कचरा संकलनासाठी घरटी १९ रुपये मोजण्यात येणार आहेत. या प्रभागातील कचरा गोळा करताना तो ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक असा घेतला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात अशाप्रकारे हे काम सुरु होणार आहे. मात्र, यापूर्वी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात फक्त ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा गोळा करण्याचेही नियोजन फसल्याने आता, तर तो सहा प्रकारात वेगवेगळा कितपत गोळा होईल, याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye    

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in