बर्डफ्लूची पुणे जिल्ह्यात एंट्री, मावळात ३,५०० कोंबड्याची विल्हेवाट

संसर्ग झालेल्या ठिकाणापासून दहा किलोमीटरपर्यंतच्या परिसरात कोंबड्या खरेदी, विक्री व वाहतुकीवर येत्या २१ दिवसांपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
Bird flu enters Pune district, disposal of 3,500 chickens in Mavla .jpg
Bird flu enters Pune district, disposal of 3,500 chickens in Mavla .jpg

पिंपरी : बर्ड फ्लूची पुणे जिल्ह्यात एंट्री झाली असून, मावळ तालुक्यातील गहूंजे क्रिकेट स्टेडियमजवळील साळूंब्रे गावातील कोंबड्यांना हा रोग झाल्याचे निदान झाले आहे. काल रात्री उशीरा त्याला पुष्टी मिळाल्याने तातडीने तेथील साडेतीन हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

दरम्यान, या रोगाच्या एंट्रीमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून त्याचा संसर्ग झालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घोषित केला आहे. तर, त्यालगतचा दहा किलोमीटरचा परिसर निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.

ही लागण झालेल्या पोल्ट्रीमालकाच्या कुटुंबियांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्याच नव्हे, तर त्यांची अंडी आणि खाद्यही नष्ट करण्याचा आदेश जलद कृती दलास देण्यास आला आहे. तसेच संसर्ग झालेल्या ठिकाणापासून दहा किलोमीटरपर्यंतच्या परिसरात कोंबड्या खरेदी, विक्री व वाहतुकीवर येत्या २१ दिवसांपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

साळुंब्रे येथील पोल्ट्री व्यावसायिक अरुण राक्षे यांच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत पावल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी कोंबड्याच्या मरतुकीचे नमूने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट काल रात्री पॉझीटीव्ह येताच खबरदारी म्हणून आज मावळचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी राक्षे यांच्या पोल्ट्री फार्मला भेट दिली.

मावळचे तहसीलदार मधुसुधन बर्गे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे, डॉ अनिल परंडवाल, तलाठी दिलीप राठोड, उपसरपंच विशाल वाहिले आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

फार्मवरील साडेतीन हजार पक्षांची जेसिबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन विल्हेवाट लावण्यात आली. आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरातील सुमारे ३२,७०० पक्षांचीही विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांनी दिली.

पोल्ट्री व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा प्रति कोंबडी दर अतिशय कमी असून तो वाढवून देण्याची विनंती पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती वायकर यांनी दिली. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com