बैलगाडा शर्यतीसाठी बाळा भेगडेंचे फडणवीसांनाच साकडे

पन्नास जण फडणवीस यांची भेट घेणार आहेत, असे भेगडे यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीसाठी बाळा भेगडेंचे फडणवीसांनाच साकडे
Sarkarnama Banner - 2021-08-17T083738.195.jpg

पिंपरी : बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी बैलगाडा मालकांनी व त्यांच्या संघटनेने आमदार, खासदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देताच लोकप्रतिनिधी आता सक्रिय झाले आहेत. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे बैलगाडामालक व संघटनेच्या प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. त्याला मावळचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील शेळके उपस्थित होते. त्यानंतर मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे Bala Bhegade यांनी त्यापुढे एक पाऊल टाकले आहे. आज (ता.१७) सकाळी ते याच मागणीसाठी बैलगाडा मालकांना घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांना पुणे विमानतळावर भेटणार आहेत.  

फडणवीस हे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी सांगोला (जि. सोलापूर) येथे जाणार आहे. त्यासाठी ते नागपूरहून विमानाने पुण्याला येणार आहेत. तेथून ते मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. तत्पूर्वी विमानतळावर त्यांना गाठून भेगडे व बैलगाडामालक व संघटनेचे शिष्टमंडळ त्यांना ही शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्याकरीता निवेदन देणार आहेत. कोरोना नियम पाळून पन्नासजण फक्त फडणवीस यांची भेट घेणार आहेत, असे भेगडे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने संरक्षित प्राण्याच्या यादीतून बैलाला वगळले, तरी ही शर्यत पुन्हा सुरु होण्याच्या मार्गातील एक मोठा अडसर दूर होणार आहे. त्यामुळे केंद्रात मोठे वजन असलेल्या फडणवीसांना भेटून या निर्णायक लढाईत एक पाऊल पुढे जाण्याचे भेगडे यांनी ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारी (ता. १६) जिल्ह्यातील बैलगाडा मालक व त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चाही केली.

बैलगाडा शर्यतीच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या व एकही सुनावणी न झालेल्या खटल्यात स्वत: लक्ष घालून तात्काळ सुनावणीसाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे भेगडे यांनी आजच्या बैठकीनंतर सरकारनामाला सांगितले. तसेच तत्कालीन केंद्र सरकारने २०११ रोजी बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत केल्याने या शर्यतीवर सर्वोच्य न्यायालयाने २०१४ ला बंदी घातलेली आहे. म्हणून या संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळा ही मागणी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्त्तम रुपाला यांची भेट घेऊन करा,अशी विनंतीही माजी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चारशे वर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत बंद झाल्याने बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. देशी बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, असे भेगडे म्हणाले. बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत असून ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या जत्रेत यानिमित्त होत असलेली आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत ही शर्यत सुरु असून त्यावर, मात्र बंदी नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

  Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in