मैदानातील कोविड सेंटरचा अट्टाहास ठेकेदारांच्या भल्यासाठीच : लांडगे, जगतापांवर भाजप नगरसेवकाने डागली तोफ - Attempt to set up Kovid Center in the ground for the benefit of contractors : Ravi Landage | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मैदानातील कोविड सेंटरचा अट्टाहास ठेकेदारांच्या भल्यासाठीच : लांडगे, जगतापांवर भाजप नगरसेवकाने डागली तोफ

उत्तम कुटे
मंगळवार, 4 मे 2021

विद्युत यंत्रणेवरच एवढे कोटी खर्च होणार असतील, तर...

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन मोकळ्या मैदानांत कोट्यवधी रुपये खर्चून दोन जंबो कोविड रुग्णालये उभारण्याच्या पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्रस्तावाला पक्षाचेच नगरसेवक रवी लांडगे यांनी विरोध करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्याऐवजी शहरात मोकळ्या पडून असलेल्या महापालिकेच्या मोठ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती, मंगल कार्यालयांत ती सुरू करण्याची सूचनावजा मागणी त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे  सोमवारी (ता. ३ मे) केली. ठेकेदारांचे भले करण्यासाठीच हा उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Attempt to set up Kovid Center in the ground for the benefit of contractors : Ravi Landage)

पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघात ही जंबो सेंटर उभारण्याचे प्रस्ताव आहेत. लांडगे यांच्या भोसरीतील गावजत्रा मैदानात, तर जगतापांच्या सांगवीत पीडब्ल्यूडी मैदानात ती उभारण्याचे सत्ताधाऱ्यांचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी तेथे विद्युत व्यवस्था उभारणीसाठी पावणेआठ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. फक्त विद्युत यंत्रणेवरच एवढे कोटी खर्च होणार असतील, तर दोन्ही जंबो कोविड रुग्णालयांवर, तर काही शेकडो कोटी रुपये खर्च होण्याची भीती रवी लांडगे यांनी व्यक्त केली. 

तसेच, तयार इमारतीत म्हणजे पालिकेच्या मोठ्या शाळा वा मंगल कार्यालयात ती उभारली गेली, तर विद्युत व्यवस्थेवरील कोट्यवधी रुपयेही वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पालिकेच्या नेहरूनगर मैदानातील जंबो कोविड रुग्णालय व चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये पाणी घुसल्याने ती महिनाभर बंद ठेवण्याची पाळी आली होती. त्याची पुनरावृत्ती या पावसाळ्यातही होण्याची शक्यता असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती रवी लांडगेंना वाटते. 

या दोन्ही कोरोना रुग्णालयांच्या उभारणीस महिनाभराचा कालावधी लागणार आहे. दुसरीकडे, मोठ्या इमारतीत ती लगेच सुरु करता येणार आहेत, याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. तरीही मैदानातच ती सुरु करण्याचा अट्टाहास हा ठेकेदारांचेच भले करण्यासाठी चालला आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या कोट्यवधी रुपयांची ही उधळपट्टी करू नका, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे.

उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या शहरातील कोरोना आढावा बैठकीतही या अशा मैदानातील कोविड रुग्णालयांऐवजी शहरातील पालिकेची चार रुग्णालये ऑक्सिजनसह सुसज्ज करण्यास सांगितले आहे. तसेच गरज लागली, तरच मोकळ्या तयार इमारतीत ती सुरु करता येतील, असे त्यांनी पालिका प्रशासनाला सुचविले. यामुळे प्रशासन दुहेरी कोंडीत सापडले ते काय निर्णय घेते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

आताची वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्या प्रत्येकाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या मोठ्या मिळकतींमध्ये कमीत कमी खर्चात कोविड रुग्णालये सुरू करता येणे सहज शक्य आहे, असा प्रस्ताव रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिला आहे. याशिवाय शहरात अनेक मोठी मंगल कार्यालये आणि महाविद्यालयेसुद्धा आहेत. तेथे चांगल्या प्रकारची विद्युत व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे.

त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्याही उपलब्ध आहेत. याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केल्यास विद्युत व्यवस्थेवरील कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. फक्त बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून दिली की तेथे कोविड रुग्णालये सुरू होणार आहेत, याकडे रवी लांडगे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख