दोनशेचा टोल बुडवला अन् गुंड गजा मारणेवर खंडणीचा गुन्हा  - Another case will be filed against Gajja | Politics Marathi News - Sarkarnama

दोनशेचा टोल बुडवला अन् गुंड गजा मारणेवर खंडणीचा गुन्हा 

उत्तम कुटे 
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पुण्यातील सराईत गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर टोल न भरल्याचे आढळले आहे.

पिंपरी : पुण्यातील सराईत गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर टोल न भरल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता खंडणीचा नवा गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिस दाखल करणार आहेत. 

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ तारखेला गजाची त्याच्या साथीदारांनी पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी त्यांनी टोल न भरल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र असा खंडणीचा गुन्हा दाखल करून कडक कारवाईची संधी पोलिसांना आयतीच मिळाली आहे. मुंबई ते पुणे चारचाकी वाहनासाठी २७० रुपये टोल आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गजाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणखी दोन आलिशान मोटारी जप्त केल्याने या गाड़्यांची संख्या आता १३ झाली आहे. त्यांची किंमत तीन ते चार कोटी रुपये आहे. या मिरवणुकीत भाग घेतलेल्या आणखी १६ जणांची ओळख सीसीटीव्हीव्दारे पटवून त्यांना पोलिसांनी पकडले. यामुळे अटक झालेल्यांची संख्या ३३ झाली. मात्र, त्यांच्याविरुद्धचा गुन्हा जामीनपात्र असल्याने या  सर्वांची न्यायालयाने सुटका केली आहे. 

गुंड मारणेचा फोटो, व्हिडीअो लाईक केला तरी गुन्हा दाखल होणार

मिरवणुकीव्दारे दहशत माजवल्याबद्दल गजा व साथीदारांविरुद्ध घाटाखाली खोपोली, तर घाटावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी येथे दोन आणि पुण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, गजा त्यानंतर फरारी झाला आहे. 

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यावरील गुन्ह्याचा तपास करताना गजा व साथीदारांनी एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर टोलच भरला नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध लगेचच जामीन होणार नाही. असा खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज सांगितले. त्यामुळे गजा सापडला, तर आता त्याची लगेचच जामीनावर सुटका होणे अवघड झाले आहे. 

पिंपरीच्या महापौर अडचणीत येणार 
 

दरम्यान, गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी आणखी कठोर कारवाई सुरू केली असून मारणेचा व्हिडीओ युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयाद्वारे पसरविणाऱ्यांसह त्यास प्रतिसाद देऊन प्रतिक्रीया देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे व त्याच्या सहानुभूतीदारांना सोडणार नसल्याचा इशारा या निमित्ताने पुन्हा एकदा दिला आहे. मारणे सध्या फरार असून त्याचा शोध जोमाने सुरू आहे.

एखाद्या गुंडाने समाजात दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडीओ क्‍लिप प्रसारित केली असेल किंवा त्याने प्रसारित केलेल्या व्हिडीओला लाईक करणे, त्यावर भाष्य करणे हा गुन्हा आहे. अशा कृतीमुळे गुंडांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे गुंडाच्या पाठराख्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख