पिंपरीत राष्ट्रवादीबरोबर शिवसेनाही लागली महापालिकेच्या तयारीला 

महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पक्षाकडून आवश्‍यक मदत केली जाईल.
 पिंपरीत राष्ट्रवादीबरोबर शिवसेनाही लागली महापालिकेच्या तयारीला 
Along with NCP in Pimpri, Shiv Sena also started preparing for PCMC election

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि सत्ता मिळाल्याने हुरूप वाढलेल्या शिवसेनेने मुंबईनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही सत्तेत येण्यासाठीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. खरे तर पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुकीला अद्याप 14 महिन्यांचा अवकाश आहे. पण, शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी मिशन-2022 अभियान सुरु केले आहे. त्यात प्रभागनिहाय बैठकांचा सपाटा लावला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष असणार आहे. 

दरम्यान, अनागोंदी कारभार आणि चुकीची कामे लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 च्या आगामी निवडणुकीत सत्ताबदल अटळ आहे, असा आत्मविश्वास या मिशनच्या बैठकीत पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (ता. 14 डिसेंबर) येथे व्यक्त केला. 

महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पक्षाकडून आवश्‍यक मदत केली जाईल, असे आश्वासन बारणे यांनी या वेळी दिले. त्यासाठी इच्छुकांनी जनहिताच्या कामाद्वारे धनुष्यबाण घराघरांत पोचवून पालिका निवडणुकीतील सत्ताबदलाचे शिलेदार व्हावे, असे ते म्हणाले. 

या आभियानांतर्गत शहरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार बारणे बोलत होते. महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची, मतदार नोंदणी तसेच शिवसेना सभासद नोंदणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, सरीता साने आदी उपस्थित होते. 

राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी करावे, असे आवाहनही बारणे यांनी या वेळी केले. जनतेची कामे होण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सक्षम होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in