अजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर... - Ajit Pawar instructed the Municipal Commissioner to reduce the rent Pimpri Court | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर...

उत्तम कुटे
सोमवार, 4 जानेवारी 2021

पिंपरी महापालिका भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा हा प्रस्ताव मंजूर करते का कसे याकडे वकीलवर्गच नाही, तर शहराचेही आता लक्ष लागले आहे.

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी बारच्या पदाधिकाऱ्यांना सहा दिवसांपूर्वी दिलेला शब्द आज खऱा केला. मुलभूत सुविधाही नसलेल्या सध्याच्या अपुऱ्या जागेतील पिंपरी कोर्ट नेहरूनगर या दुसऱ्या प्रशस्त ठिकाणी हलविण्याच्या प्रश्नी त्यांनी या पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पिंपरी पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांना नेहरूनगर येथील जागेचे भाडे कमी करण्यास आपल्या सचिवांना सांगितले. ते झाले, तर पिंपरी कोर्ट स्थलांतराच्या मार्गातील मोठा व मुख्य अडसर दूर होऊन ते लवकरच नव्या जागेत गेलेले दिसेल.

दरम्यान, आजच्या या बैठकीनंतर कोर्ट हलविण्याचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. पालिकेने ठरवलेले १४ लाख रुपये महिना हे न्यायालयाचे भाडे कमी केले, तर पिंपरी कोर्ट नव्या जागेत स्थलांतर होण्यातील मुख्य अडसर दूर होणार आहे. नववर्षात वकिलांनाच नाही, तर पक्षकारांनाही ही भेट ठरणार आहे. भाजप सत्तेत असलेली पिंपरी महापालिका भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा हा प्रस्ताव मंजूर करते का कसे याकडे वकीलवर्गच नाही, तर शहराचेही आता लक्ष लागले आहे.

सध्याचे शहर न्यायालय हे भाड्याच्याच जागेत पालिकेच्या इमारतीत ते सुरु झाल्यापासून म्हणजे १९८९  पासून आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. मुलभूत सुविधांचीही तेथे वानवा आहे. त्यात ही जागा वर्दळीच्या अपघातग्रस्त चौकात आहे.  त्यामुळे तिचे तातडीने स्थलांतर करण्याची मागणी वकिलांनी केली होती. पालिकेने नेहरूनगर येथील प्रशस्त जागा त्यासाठी देऊ केली. मात्र, त्याकरीता भाडे म्हणून १४ लाख रुपये मागितले आहे. तो प्रस्ताव विधी व न्याय विभागाने मंजूर केला होता. मात्र, लॉकडाउनमुळे नव्या खर्चावर निर्बंध असल्याने हे स्थलांतर रखडले होते. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्यासाठी पिंपरी बार शिष्टमंडळाने २९ डिसेंबरला शहरात खासगी भेटीवर आलेल्या अजितदादांना निवेदन देऊन मार्ग काढण्यास सांगितले होते. त्यावर त्यांनी आज मुंबईत चर्चेला बोलावले होते. 

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस असोसिएशनचे अध्यक्ष अॅ़ड. दिनकर बारणे, उपाध्यक्ष अतुल अडसरे, सेक्रेटरी अॅड. हर्षद नढे, माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर-पाटील, अॅड. सुभाष चिंचवडे, राष्ट्रवादीच्या लिगल सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अॅड गोरक्ष लोखंडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीचे माजी सदस्य आतिष लांडगे यांनी आज मुंबईत अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या सचिवांना पिंपरी पालिका आयुक्तांना फोन करून पिंपरी न्यायालयाचे भाडे कमी करण्यास सांगितले. ते झाले, तर कोर्ट लवकरच नव्या जागेत गेलेले दिसेल, असा आशावाद अॅड. बारणे, अॅड. लांडगे, अॅड. लोखंडे यांनी अजितदादांबरोबरील या सकारात्मक चर्चेनंतर 'सरकारनामा'शी मुंबईहून बोलताना व्यक्त केला. 

Edited  by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख