अजित पवारांनी अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे यांना दिली समज  - Ajit Pawar gave understanding to Anna Bansode and Sanjog Waghere | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनी अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे यांना दिली समज 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीच्या नंतर संघटनेत बदल केले जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघामधील अपक्ष उमेदवाराच्या अर्ज भरतेवेळी उपस्थित राहिलेले पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून समज दिली. पक्षाचे काम शहरात ढेपाळले असल्याचेही त्यांनी सुनावले. 

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीच्या नंतर संघटनेत बदल केले जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले. आता ऍक्‍टिव्ह व्हावे लागेल, असे सांगून त्यांनी नव्या बदलात तरुण व ऍक्‍टिव्ह पदाधिकारी असतील, याचेच संकेत दिले. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज (ता. 22 नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. 

ते म्हणाले की मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांनी अरुण लाड या नावाचा दुसरा उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे गाफील न राहता पहिल्या क्रमांकावर असलेल्या आपले अरुण गणपती लाड यांनाच बहुमताने निवडून आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मताचे टार्गेट द्या, असे त्यांनी बजावले. मागच्या वेळी झालेल्या चुका करु नका, कुणाला अपमानित करू नका, मित्रपक्षांना विश्वासात घ्या, असे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले. 

मन की बात केली जाते, पण काम की बात होत नाही. वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचंही असंच झालं आहे. त्याचं काय झालं, माहित नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केला. 

केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांवर अन्याय, तर झालाच आहे. पण, त्यामुळे बेकारीही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप अजितदादांनी केला. ही बेकारी दूर करण्यासाठी "मन की बात'मध्ये काही सांगितले जात नाही वा केलेले जात नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. कोरोना होऊन गेला, तरी काळजी म्हणून त्यांनी मास्क लावूनच भाषण केले. 

राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उमेदवार लाड यांचीही या वेळी भाषणे झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख