रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अजितदादा, अमोल कोल्हे लागले कामाला  - Ajit Pawar and Amol Kolhe started working for the release of students stranded in Russia | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अजितदादा, अमोल कोल्हे लागले कामाला 

उत्तम कुटे 
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

अडकलेले बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून त्यात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील चाळीस विद्यार्थी आहेत.

पिंपरी : युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, मुंबईसह राज्यातील 140 विद्यार्थी रशियात अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

अजित पवारांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागास पुढील कार्यवाहीचा आदेश दिला आहे, तर खासदार कोल्हे यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना साकडे घातले आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील डीवायएफआयने (डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया) अडकलेल्या या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

या संघटनेचे कार्यालयीन सचिव क्रांतीकुमार कडूलकर आणि गणेश दराडे, प्रीती शेखर यांनी अजित पवार, डॉ. कोल्हे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मदतीची विनंती केली होती. 

अडकलेले बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून त्यात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील चाळीस विद्यार्थी आहेत. त्यातील आफताब शेख या पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्याचा भाऊ अमीन याने या बाबत "सरकारनामा'ला माहिती दिली. 

कोरोनाची दुसरी लाट आल्याने ते शिकत असलेल्या कॉलेजने त्यांना आपापल्या देशात सांगितले, त्यानुसार या विद्यार्थ्यांनी एअर इंडियाची तिकिटे बुक केली होती. मात्र, हे विमान थेट नसल्याने रशियातील भारतीय दूतावासाने त्यांना परवानगी नाकारली. त्यांना थेट खासगी विमानाने आपल्या जबाबदारीवर जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन काढलेली तिकिटे आता रद्द करावी लागणार आहेत. त्याचे त्यांना प्रत्येकी अवघे आठ हजार रुपये मिळणार असल्याने या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, पुन्हा तिकिट काढण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. परिणामी ते अडकून पडले आहेत. 

केरळ राज्याने कोरोनामुळे परदेशात त्यातही आखाती देशांत अडकलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांना जसे विशेष विमानाने आणले, तसे महाराष्ट्रानेही आपल्या विद्यार्थ्यांना आणावे, अशी विनंती "डीवायएफआय'ने राज्य सरकारकडे केली आहे. 

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी रशियासह बाल्टिक देशांनी कडक निर्बंध लादले असताना दुसरीकडे तेथील भारतीय दूतावास सहकार्य करीत नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईकांनी केला आहे. 

दरम्यान, मदतीचा हा मेल मिळताच उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार कोल्हे लगेच सक्रिय झाले. अजित पवारांनी मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाही करण्यास सांगितले. डॉ. कोल्हे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला. त्यानंतर हे मंत्रालयही कामाला लागले आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेवर रशियातून आणले जाईल, असा विश्वास खासदार कोल्हे यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख