अजितदादा म्हणाले,  "ह्या तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी 

मोफत आयसीयू बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याच्या घटनेत कारवाईचे संकेत अजित पवार यांनीदिले.
अजितदादा म्हणाले,  "ह्या तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी 
Sarkarnama Banner - 2021-05-01T134705.758.jpg

पिंपरी : खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची सुरु असलेली लुट म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अवलादी असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरीत केला. त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे सूचित करताना पिंपरी पालिकेच्या ऑटोक्लस्टर कोरोना सेंटरमध्ये मोफत आयसीयू बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याच्या काल उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेत कारवाईचे संकेत त्यांनी दिले.

कोरोनाचा प्रार्दूभाव झालेल्या पालिकेच्याच मुख्याध्यापिकेला आय़सीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये पालिकेचे कोरोना सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरने घेतल्याचे खळबळजनक प्रकार दोन नगरसेवकांनी काल उघडकीस आणल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे. कालच पालिका सभेत त्यावरून मोठे घमासानही झाले.त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्र्यांनीही संताप व्यक्त केला. 

पिंपरी-चिंचवड येथे पवार माध्यमांशी बोलत होते. कोरोना रुग्णांचे हे आर्थिक शोषण आणि कोरोना सेंटरमधील सुविधांची वानवा हे प्रकार निदर्शनास येताच आता ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न प्रशासन आणि पोलिसही करीत असल्याचे सांगताना पालिका कोरोना सेंटरमधील उघडकीस आलेल्या गैरप्रकारावर फौजदारी कारवाईचे संकेत त्यांनी दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पिंपरीत आले होते. यावेळी त्यांनी पालिकेच्या वॉररुमला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

४५ वर्षांपुढील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या नागरिकांमध्ये कोव्हिड-१९ संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यासाठी १८ ते ४५ या वयोगटातील लसीकरणासाठी साडेसहा हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, त्यासाठी लस आयातीकरणाला तातडीने परवानगी दिली, तर बरं होईल. कारण ही लस उत्पादन करणाऱ्या देशातील दोन कंपन्यांची क्षमता ही देशाच्या लोकसंख्येच्या खूपच कमी आहे. परिणामी लसीकरणासाठी बराच काळ लागणार आहे, असे ते म्हणाले. कोरोनावर आंतरराष्ट्रीय मीडियाने भारतावर केलेल्या टीकेवर बोलताना बाहेरचा हा मिडिया त्यांना योग्य वाटतंय ते म्हणतोय. ती वस्तुस्थिती आहे. कारण कोरोना वाढतोय. त्यामुळे केंद्र व राज्याने त्याबाबत एकमेकांवर टीका न करता व एकमेकांची उणीदुणी न काढता त्याला सामोरे गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in