प्रभूणेंच्या संस्थांच्या करमाफीसाठी विलास लांडे लिहिणार मुख्यमंत्र्यांना पत्र  - Vilas Lande will write a letter to the Chief Minister for tax exemption for Prabhune's institutions | Politics Marathi News - Sarkarnama

प्रभूणेंच्या संस्थांच्या करमाफीसाठी विलास लांडे लिहिणार मुख्यमंत्र्यांना पत्र 

उत्तम कुटे 
रविवार, 31 जानेवारी 2021

शिवसेनेनंतर रविवारी (ता. 31 जानेवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसही मैदानात उतरल्याने भाजप एकाकी पडला.

पिंपरी : जप्तीची नोटीस मिळालेल्या गिरीश प्रभूणे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेनंतर रविवारी (ता. 31 जानेवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसही मैदानात उतरल्याने भाजप एकाकी पडला. भाजपची सत्ता असलेली पिंपरी महापालिका त्यामुळे बॅकफूटवर गेली. परिणामी प्रभूणेंच्या संस्थेची जप्ती येत्या मंगळवारी (ता. 2 फेब्रुवारी) होण्याची शक्‍यता मावळली आहे. ज्या थकित करापोटी ही नोटीस आली, तोच कर पूर्णपणे माफ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी रविवारी सांगितले. 

पालिकेने प्रभूणेंना दिलेली नोटीस पूर्णपणे चुकीची असून बांबूच्या साध्या बांधकामाला कोट्यवधीचा कर चुकीच्या पद्धतीने आकारला गेल्याचे लांडे म्हणाले. उलट प्रभूणेंच्या शाळेने आपली जागा पुलासाठी दिली असून त्याचा मोबदला पालिकेने का दिला नाही, अशी विचारणा आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दिलेल्या जागेचीही कर आकारणी केली गेली असल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

दरम्यान, रजेवर असलेले पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही प्रभूणेंना फोन करून रजेवरून येताच 4 तारखेला हे प्रकरण हाताळू, असे सांगितले. त्यामुळे त्यापूर्वी पालिकेकडून होणारी जप्तीची कारवाई होणार नसल्याला पुष्टी मिळाली आहे. 

पद्मश्री जाहीर झालेल्या प्रभूणे अध्यक्ष असलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या दोन शैक्षणिक संस्थांना (क्रांतीवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम) तीन कोटी रुपयांच्या थकित मिळकत करापोटी पालिकेने नोटीस बजावल्यानंतर मोठे काहूर उठले आहे. 

शिवसेनेच्या उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या प्रभूणेंच्या समर्थनार्थ पहिल्यांदा शनिवारी (ता. 30 जानेवारी) जाहीरपणे उतरल्या. त्यांनी प्रभूणेंना फोन करून आश्वस्त केले. तर, आयुक्तांना याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्याचा आदेशही दिला. प्रभूणेंच्या संस्थांचा कर कमी करता येईल का, हे ही पाहण्यास सांगितले. तर, आज प्रभूणेंची भेट घेतलेले राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार लांडे यांनी ज्या संस्थांतील कार्यासाठी प्रभूणेंना पद्मश्री जाहीर झाली, त्या संस्थांचा कर पूर्ण माफ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. 

तत्पूर्वी ते अध्यक्ष असलेल्या पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसूंभे व सदस्यांनी पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल प्रभूणेंचा सत्कार करून अभिनंदन केले. त्यानंतर लांडे यांनी प्रभूणेंशी चर्चा केली. 

या वेळी आपल्या शाळेचे बांधकाम हे "ब्लू लाईन' जाहीर होण्यापूर्वी झाले असल्याने ते अनधिकृत ठरत नसल्याचे प्रभूणे यांनी सांगितले. तसेच ते बांबूचे साधे बांधकाम असून आरसीसीचे पक्के नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शहरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेला करमाफी मिळाली असल्याचे सांगत तुमच्या संस्थेलाही ती मिळवून देऊ, असे सांगत लांडे यांनीही प्रभूणेंना आश्वस्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख