जेव्हा आमदारच वाहतूक कोंडी सोडवतात - Maval NCP MLA Sunil Shelke Helped to Ease Traffic Jam | Politics Marathi News - Sarkarnama

जेव्हा आमदारच वाहतूक कोंडी सोडवतात

उत्तम कुटे
रविवार, 10 जानेवारी 2021

सायंकाळी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनीलअण्णा शेळके सोमाटणेफाटा येथे सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकले. त्यामुळे त्यांनी मोटारीतून उतरत स्वत टोल नाक्यावरील अडथळे (बॅरिअर) दूर करीत वाहतूक सुरळीत केली.

पिंपरी : टोलनाका आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा हे चित्र सगळीकडेच दिसते. पुणे-मुंबई महामार्गही त्याला अपवाद नाही. त्यातही शनिवारी,रविवारी तेथे यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. सर्वसामान्य त्यात नेहमीच अडकतात.

पण, काल (ता.९) सायंकाळी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनीलअण्णा शेळके हेच त्यात सोमाटणेफाटा येथे सायंकाळी अडकले. त्यामुळे त्यांनी मोटारीतून उतरत स्वत टोल नाक्यावरील अडथळे (बॅरिअर) दूर करीत वाहतूक सुरळीत केली.

शेळके हे एका कार्यक्रमासाठी हे देहूरोडला आले होते.तेथून ते परत तळेगावला आपल्या घरी निघाले होते. सायंकाळी ते सोमाटणे टोलनाक्यावर वाहतुक कोंडीत सापडले. तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे पाहून आमदार मोटारीतून उतरले. रांगेतून काही अंतर चालत ते टोलनाक्यावर गेले व त्यांनी पुण्याहून तळेगावच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या मार्गातील नव्हे,तर दुसऱ्या लेनचाही अडथळा दूर केला. त्यामुळे रांगेतील वाहने सूसाट सुटली. 

यानंतर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनमधील सुद्धा बॅरिअर हटवले गेले आणि क्षणार्धात टोलनाक्यावरील रांग संपली. यामुळे रांगेत तिष्ठत राहिलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. असेच आमदारांनी गर्दीच्या वेळी सकाळ,संध्याकाळी या रस्त्यावरून व या टोलनाक्यावरून ये- जा करावी, अशी मिश्कील टिपण्णी तेथील रांग व वाहतूक कोंडीतून सुटका झालेल्या तळेगावच्या एका वाहनचालकाने केली. 

वाहनांच्या या रांगा आठवड्याच्या शेवटी व सुट्यांच्या दिवशी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुद्धा पहायला मिळतात. त्यावर फास्टटॅग हा उपाय काढला,तरी या रांगा कमी झालेल्या नाहीत.दरम्यान, फास्टटॅग लागू करण्यात मुदतवाढ मिळाल्याने रांग व कोंडी अद्याप एक्सप्रेस वे वर त्यातही शनिवारी, रविवारी पहायला मिळतच आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख