भोसरीचे प्रथम आमदार लांडे दिवसागणिक आक्रमक - Bhosari Leader Vilas Lande geetting Aggressive Day By Day | Politics Marathi News - Sarkarnama

भोसरीचे प्रथम आमदार लांडे दिवसागणिक आक्रमक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

लांडे हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध प्रश्नी खूपच आक्रमक झाले आहेत.दुसरीकडे,मात्र भाजप सत्ताधारी असलेल्या पालिकेतील कोरोना घोटाळा, एफडीआर घोटाळा आणि लेखापरिक्षण घोटाळ्याबाबत शहर राष्ट्रवादीचे सूचक मौन चर्चेचा विषय झाला आहे.

पिंपरी : भोसरीतील दोन कोविड सेंटरमध्ये एकाही रुग्णावर उपचार न करता सुद्धा सव्वापाच कोटी रुपयांचे बिल पाठवणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला ते,तर देऊच नका. उलट,ते मागणाऱ्या कोविड सेंटरचे चालक आणि स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ .अमोल हळकुंदे यांच्याविरुद्ध पालिकेची फसवणुकीचा केल्याबद्दल फौजदारी करा,अशी मागणी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, लांडे हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध प्रश्नी खूपच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे,मात्र भाजप सत्ताधारी असलेल्या पालिकेतील कोरोना घोटाळा, एफडीआर घोटाळा आणि लेखापरिक्षण घोटाळ्याबाबत शहर राष्ट्रवादीचे सूचक मौन चर्चेचा विषय झाला आहे. लांडे यांनी आय़ुक्तांकडे केलेल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच नगरविकासमंत्र्यांनाही दिलेआहे,त्यात लांडे म्हणतात, एकही रुग्ण दाखल नसताना भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. हळकुंदे यांनी पाच कोटी २६ लाख साठ हजार आठशे रुपयांचे बिल पालिकेकडे मागितले आहे. 

या सेंटरसाठी पालिकेने करारच केलेला नाही. तसेच तेथे एकाही रुग्णावर उपचार झालेले नाहीत.तरीही त्यांनी सव्वापाच कोटी रुपयांचे हे बिल मागणे म्हणजे ही पालिकेची शुद्ध फसवणूक आहे. त्यात ते अदा करण्यााच्या स्थायी समितीने सुरु केलेल्या हालचाली म्हणजे प्रामाणिक कर भरणाऱ्या जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी ठरणार आहे. पालिका अधिकारी सामील असल्याशिवाय डॉ हळकुंदे हे धाडस करणार नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यााविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

दरम्यान, लांडे यांच्यानंतर प्रहार या सामाजिक संघटनेनेही या प्रकरणात सामील असणाऱ्या स्पर्शवर फौजदारी कारवाईची मागणी,, केली आहे. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबवून त्यातील दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा,त्यांची खातेनिहाय चौकशी लावा, अशी मागणी या संघटनेने आयुक्तांकडे काल केली.अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी हा विषय तो फेटाळावा,अशी विनंती स्थायी समिती अध्यक्षांना केली आहे. तसेच तो मंजूर केला,तर त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख