अजित पवारांमुळे वाचणार पिंपरीतील 450 वनौषधी झाडे 

गेली वर्षभर पाठपुरावा करीत असलेल्या निमाया डॉक्‍टरांच्या संघटनेच्या धडपडीला अखेर यश आले.
अजित पवारांमुळे वाचणार पिंपरीतील 450 वनौषधी झाडे 
Ajit Pawar will save 450 herbal Trees in Pimpri

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वनौषधी उद्यान व तेथील साडेचारशे दुर्मिळ वनौषधी झाडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे अखेर वाचणार आहेत. एमआयडीसीच्या भूखंडावरील या झाडांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्यासाठी जागा देण्यास पालिका आयुक्तांना त्यांनी आज (ता. 9 जानेवारी) सांगितले. त्यामुळे ही झाडे लावून ती वाढविलेल्या व आता त्यावर कुऱ्हाड आल्याने ती वाचविण्याकरिता गेली वर्षभर पाठपुरावा करीत असलेल्या निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) या डॉक्‍टरांच्या संघटनेच्या धडपडीला अखेर यश आले. 

एमआयडीसीने आपल्या मालकीचा एक एकरचा लांडेवाडी, भोसरी एमआयडीसीतील भूखंड पालिकेला वनीकरणासाठी दिला होता. तो पालिकेने निमाला 2008 मध्ये 21 वर्षांच्या कराराने दिला. याच ओसाड माळरानवजा उंचसखल जमिनीवर निमाने ही साडेचारशे दुर्मिळ वनौषधी झाडे लावून ती जगवली. आता ती आठ ते दहा फूट उंचीची झालेली आहेत. 

दरम्यान, पालिकेला कसलीही कल्पना न देता एमआयडीसीने हा भूखंड एका उद्योजकाला विकला. त्यांनी ही झाडे प्लॉटमधून काढून टाकण्याची मागणी पालिकेकडे केली. तेव्हापासून ती वाचवण्यासाठी निमाचा आटापिटा सुरू होता. एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधींपासून पर्यावरणमंत्री, उद्योगमंत्री ते मुख्यमंत्री अशा सर्व पातळीवर त्यांचे प्रयत्न चालले होते. शेवटी ते पाच जानेवारीला अजित पवारांना मुंबईत भेटले. 

एक घाव दोन तुकडे या आपल्या कामाच्या पद्धतीने आज पुण्यात अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि निमाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानुसार आज ती पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस येथे झाली. पिंपरी चिंचवड निमाचे अध्यक्ष डॉ सत्यजित पाटील, सचिव डॉ अभय तांबिले, राज्यप्रतिनिधी डॉ दत्तात्रेय कोकाटे, केंद्र प्रतिनिधी डॉ नंदकुमार माळशिरसकर व वृक्षप्रेमी श्रीकांत काकडे या वेळी उपस्थित होते. 

या वेळी वसुंधरा संरक्षणासाठी मुंबईतील आरेच्या जंगलातील मेट्रोचे कारशेड राज्य सरकारने कांजूरमार्ग येथील मिठागराच्या जमिनीवर हलविल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. तसेच या झाडांवरही कुऱ्हाड येऊ देणार नसल्याचे सांगून त्यांचे इतरत्र पुनर्रोपण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. वृक्षसंवर्धनासाठी निमासारख्या संघटनेसोबत सरकार आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. ही झाडे कशी व कुठे हालवायची याबाबत आयुक्त, पालिकेचा उद्यान विभाग आणि निमा प्रतिनिधींची सोमवारी (ता. 11) बैठक होणार आहे, अशी माहिती डॉ. तांबिले यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in