अजित पवार भल्या पहाटे 'मेट्रो'त - Ajit Pawar took Metro Officials Meeting at Wee Hours | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार भल्या पहाटे 'मेट्रो'त

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

पमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आज पहाटे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली, त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या कामाचा आढावा घेत त्यांनी काही सूचना केल्या.

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आज पहाटे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली, त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या कामाचा आढावा घेत त्यांनी काही सूचना केल्या. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिल्यामुळे महापालिका पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही खळबडून जागे झाले. काही पदाधिकारी फुगेवाडी व वल्लभनगर येथे पोहचेपर्यंत पवार बैठक उरकून परतले होते. अजित पवार यांनी आज फुगेवाडी ते वल्लभनगर दरम्यान मेट्रोने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पवार यांनी प्रवास केलेला नसून दोन्ही स्थानकांना भेट देऊन पाहणी केली व अधिकारी दीक्षित यांच्याकडून कामाचा आढावा घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी पिंपरी ते पुणे महापालिका हद्द अर्थात दापोडी जवळील हॅरिस ब्रीज पर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गत फुगेवाडी व वल्लभनगर स्थानकाचे काम पुर्णत्वास आले आहे. कासारवाडी, नाशिक फाटा, खराळवाडी व पिंपरी स्थानकांची कामे सुरू आहेत. मेट्रो मार्गावर इलेक्ट्रीक केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. या कामांची पाहणी करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या संपूर्ण कामाचा आढावा पवार यांनी घेतला. तत्पूर्वी मेट्रो अधिका-यांची फुगेवाडी कार्यालयात बैठकही घेतली.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख