मतदार तिप्पट झाले,मताचा टक्का वाढणार का?

आज होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील काही मतदारांना मतदानासाठी १६ किलोमीटर एवढी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत यावेळीही हा रेकॉर्ड कायम राहतो की काय ही भीती प्रमुख राजकीय पक्षांना भेडसावत आहे.
मतदार तिप्पट झाले,मताचा टक्का वाढणार का?
PCMC

पिंपरीः आज होत असलेल्या  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील काही मतदारांना मतदानासाठी १६ किलोमीटर एवढी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत यावेळीही हा रेकॉर्ड कायम राहतो की काय ही भीती प्रमुख राजकीय पक्षांना भेडसावत आहे.

गत विधानपरिषद निवडणुकीला शहरात पदवीधरचे ११ हजार मतदार होते. ही संख्या यावेळी जवळजवळ तिप्पट म्हणजे ३२ हजार झाली आहे. गतवेळी २०१४ च्या निवडणुकीत अवघे वीस टक्के मतदान शहरात झाले होते. यावेळी मतदार संख्या तिप्पट झाल्याने मतदानाचा टक्का किमान पन्नास टक्क्यावर नेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, दूरवर असलेली मतदानकेंद्रे त्यात अडथळा ठरण्याची भीती आहे. दरम्यान,पिंपरी-चिंचवडमधील सव्वातीन हजार मतदारांचे मतदान हे पुण्यात गेले आहे. म्हणजे त्यांची मतदानकेंद्रे पुण्यात असल्याने त्यांना मतदानासाठी तिकडे जावे लागणार आहे. तर, पुण्यातील नऊ हजार मतदारांना पिंपरी चिंचवडमध्ये मतदानासाठी यावे लागणार आहे. ही दुसरी मोठी अडचण मतदानाचा टक्का वाढण्याच्या मार्गात आहे.

हीच चिंता व भीती राजकीय पक्ष,त्यांचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावते आहे. त्यामुळे शहराबाहेर मतदान गेलेल्या मतदारांची यादी जिथे त्यांचे मतदान आहे तेथील कार्यकर्त्यांना काही प्रमुख राजकीय पक्षांनी पाठवली आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार असलेल्या पुणेकर मतदारांचा असा तपशीलही त्यांनी घेतला आहे. लोकसभा,विधानसभा व पालिका निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत जवळजवळ म्हणजे एकेक किलोमीटरवर मतदानकेंद्रे नाहीत. लोकसभा,विधानसभा व पालिका निवडणुकीसाठी एक हजार मतदानकेंद्र असलेल्या शहरात पदवीधरसाठी फक्त  ४३ मतदानकेंद्र आहेत. 

त्यामुळे शहराच्या एका भागातील मतदाराला मतदानासाठी दुसऱ्या टोकाला जावे लागणार आहे. अनेक मतदारांना मतदानासाठी १६ किलोमीटर एवढ्या दूरवर जाण्याची पाळी आली आहे. त्याचा फटका मतदानाला बसण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना भेडसावते आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील दहा टक्के मतदारांची मतदानाची सोय ही जाणीवपूर्वक शहराबाहेर केल्याचा आरोप एका प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in