पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेचे पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त वीस टक्के काम झाले असताना तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने या योजनेच्या सोडतीचा घाट महापालिकेतील सत्ताधारी भाजपने का घातला आहे, अशी विचारणा विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (ता. 9 जानेवारी) केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही सोडत येत्या सोमवारी (ता. 11 जानेवारी) काढली जाणार आहे. तर, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या हस्ते ती काढा; अन्यथा हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांनी दिला. त्यामुळे या योजनेनंतर तिची सोडतही वादात सापडली आहे.
शहरासाठी काडीचेही योगदान नसलेले आणि पुण्याचे पालकमंत्री असताना पिंपरी-चिंचवडकडे ढुंकूनही न पाहिलेल्या चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ही सोडत म्हणजे भाजपचे द्वेषाचे राजकारण असल्याचा हल्लाबोल मिसाळ यांनी केला. तसेच, ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. त्यात हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यानंतरही सोडतीची ही घाई फक्त वर्षभरावर पालिका निवडणूक आल्याने केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
गेली चार वर्षे एकमेकांवर कुरघोडी करण्यातच भाजपची गेली. त्यामुळे शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नाही. म्हणून राष्ट्रवादीच्या राजवटीतील मंजूर प्रकल्पांची उद्घाटने करून त्याचे श्रेय घेण्याचा भाजप प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भामा आसखेड पाणी योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास भाजपची सत्ता असतानाही पुणे महापालिकेने उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. ते दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर आता पिंपरीत या सोडतीनिमित्त अजित पवार व चंद्रकांत पाटील एकत्र येणार का? याकडे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमास अजित पवार प्रमुख पाहूणे आहेत, तर सोडत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढली जाणार असल्याचे महापौर माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना प्रत्येक विकासकामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटनाला निमंत्रीत करायला हवे. हा शिष्टाचार समजलेल्या मूळ भाजप पदाधिकाऱ्यांमुळे पवार व फडणवीस हे पुण्यात एकत्र आले. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप हा दुसऱ्या पक्षात मन गुंतलेले लोक चालवत असल्यामुळे ते पुण्यासारखा निर्णय घेणार नाहीत, अशी कोपरखळी मिसाळ यांनी मारली आहे.

