श्रीरंगअप्पा, महेशदादा, बाळाभाऊंची 'यासाठी' झाली युती!
Shrigan Barane - Bala Bhegade - Mahesh Landge

श्रीरंगअप्पा, महेशदादा, बाळाभाऊंची 'यासाठी' झाली युती!

तळेगाव दाभाडे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जनरल मोटर्स ही मल्टीनॅशनल कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे ती बंद करण्याची मागणी उद्योग खात्याकडे केली गेली आहे. असे झाले, तर तेथे काम करणाऱ्याराज्यभरातील ३५७८ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

पिंपरी : मावळ तालुक्यातील (जि.पुणे) तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनी बंद न करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी राज्य सरकारकडे केली. हीच मागणी यापूर्वी भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे व मावळचे भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळाभाऊ ऊर्फ संजय भेगडे यांनीही केली आहे. आता शिवसेना, भाजपची युती नसली,तरी जनरल मोटर्ससाठी, मात्र त्यांची सहमती झाली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून साडेतीन हजार कुटुंबांची उपासमार रोखण्याची मागणी केली आहे.

तळेगाव दाभाडे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जनरल मोटर्स ही मल्टीनॅशनल कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे ती बंद करण्याची मागणी उद्योग खात्याकडे केली गेली आहे. असे झाले,तर तेथे काम करणाऱ्या राज्यभरातील ३५७८ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्याजोडीने पिंपरी-चिंचवडसह रांजगणाव,चाकण,तळेगाव दाभाडेतील जनरल मोटर्सवर अवलंबून असलेले काही लघुउद्योगही अडचणीत येणार आहेत.

त्यामुळे जनरल मोटर्समधील कामगारांना ग्रेट वॉलमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रथम २१ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना दिलेले निवेदन त्यांनी फडणवीसांना सुद्धा दिले. या कंपनीतील दीडदोनशे कामगार हे पिंपरी-चिंचवड व परिसरातील असल्याने त्यांनी महेशदादांना साकडे घातले. त्यामुळे त्यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जनरलमधील कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवा,अशी लेखी मागणी २४ तारखेला केली. 

त्यानंतर काल बारणे यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ही कंपनी बंद करण्याची परवानगी देऊ नये,अशी विनंती केली. कंपनीने राज्य व केंद्र सरकारकडून अनेक सोईसुविधा, करांमध्ये सवलती घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान,भेगडेंचे निवेदन मिळताच त्याच दिवशी (ता.२१) फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत याप्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. ही कंपनी बंद करण्याची परवानगी देताना त्यामधील कामगारांना ग्रेट वॉल कंपनीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सरकारने करावी, असे माजी मुख्यमंत्र्यांनी आजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in