सुप्रिया सुळे म्हणतात, या दोन आमदारांचा मोठा अडथळा  - Supriya Sule says, these two MLAs are a big obstacle | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळे म्हणतात, या दोन आमदारांचा मोठा अडथळा 

उत्तम कुटे 
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

आमदारांचे महत्व काय असते, हे तीन टर्म खासदार असल्याने मला पूर्ण माहीत आहे.

पिंपरी : कार्यक्षम, कर्तृत्ववान आमदार लाभलेले खासदार भाग्यवान म्हणायला हवेत. याबाबत पाच आमदार लाभलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सर्वात सुखी आहेत. तसेच, श्रीरंगअप्पा बारणेंचे भाग्यही खूप चांगले आहे. कारण, त्यांना सुनील शेळकेंसारखा आमदार लाभला आहे. मला मात्र दोन आमदारांचा अडथळा आहे, तो बघावा लागतो, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

खासदार सुळे यांच्या बोलण्याचा रोख मतदारसंघातील भाजपचे आमदार भीमराव तापकीर (खडकवासला) आणि राहुल कुल (दौंड) यांच्याकडे असल्याची चर्चा रंगली होती. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सुळे बोलत होत्या. हलक्‍या फुलक्‍या शैलीतील भाषणात त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्षाचे मावळचे आमदार शेळके यांच्या वर्षभरातील कामगिरीचे कौतुक करताना खरंच तुमची ही पहिलीच टर्म आहे का? असा चौकार त्यांनी मारला. 

शेळके व पुरंदरचे संजय जगताप यांच्यासारखे आमदार एकाच वेळी मतदारसंघात व मुंबईतही दिसतात. कसं जमतं, त्यांना हे माहित नाही. कुणाचं लग्न, दहावाही ते चुकवित नाहीत. ते घरी जातात की नाही, हे त्यांच्या घरच्यांनाच विचारले पाहिजे? डुप्लिकेट वा जुळ्यांप्रमाणे त्यांचे काम सुरु असतं, असं त्यांनी विनोदाने सांगितले. 

त्या म्हणाल्या की, श्रीरंगअप्पांचे भाग्य खूप चांगले आहे, त्यांच्या मतदारसंघात शेळके यांच्यासारखा कर्तृत्वान आमदार निवडून आला. त्यामुळे त्यांना इथे (मावळ तालुक्‍यात) काही कामच राहिलं नाही. 

याबाबत मतदारसंघात पाच आमदार असलेले डॉ. कोल्हे सगळ्यात सुखी आहेत. मला मात्र दोन आमदारांचा अडथळा आहे. तो बघावा लागतो. या आमदारांच्या जोडीने सध्याच्या नगरसेवकांचे कॉन्टॅक्‍टही जबरदस्त आहेत. त्यामुळे पुण्यातील प्रचाराच्या मेळाव्यात मला नमस्कार करण्याऐवजी प्रथम तो नगरसेवकाला करा, असे उमेदवारांना मला सांगावे लागलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. 

आमदारांचे महत्व काय असते, हे तीन टर्म खासदार असल्याने मला पूर्ण माहीत आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

दोन्ही कॉंग्रेसची अवस्था तुझं माझं जमेना अन्‌... 

दोन्ही कॉंग्रेसची अवस्था ही तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी असल्याचे त्यांनी सांगताच पुन्हा एकदा हशा पिकला. दोन्ही कॉंग्रेस म्हणजे शेवट गोड होणारा हिंदी सिनेमा आहे, असे त्या म्हणाल्या. दोन्ही कॉंग्रेस या दूध असून त्यात आक्रमक अशी शिवसेना साखर होऊन राहिली आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, आता तिघे असल्याने अतिआत्मविश्वासात (ओव्हर कॉन्फिडन्स) पदवीधरच्या निवडणुकीत राहू नका, असा सल्ला त्यांनी तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख