लक्ष्मण जगतापांचे पत्र अन् कोरोनाविरोधातील लढाईला मिळालेले तीनशे कोटींचे बळ

चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या एका पत्रामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्याला तब्बल तीनशे कोटींहून अधिक रुपये उपलब्ध झाले आहेत.
लक्ष्मण जगतापांचे पत्र अन् कोरोनाविरोधातील लढाईला मिळालेले तीनशे कोटींचे बळ
Laxman Jagtap .jpg

पिंपरी : चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या एका पत्रामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्याला तब्बल तीनशे कोटींहून अधिक रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यातून राज्यातील हजारो गोरगरीब कोरोना रुग्णांना मोठा वैद्यकीय आधार मिळणार आहे. 

त्याचे असे झाले की पिंपरी-चिंचवडसाठी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची मागणी जगताप यांनी केली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या मोठा प्रमाणात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याने काळाबाजार होत असलेली ही इंजेक्शन आपल्या आमदार निधीतून खरेदी करून देण्याचा त्यांचा हा प्रस्ताव होता. मात्र तो नामंजूर करण्यात आला. आमदार निधीतून ती देता येत नसल्याचे कारण जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते.

मात्र, त्यानंतरही जगतापांनी विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मान्य करावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांना केली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जगतापांची मागणी मान्य, तर केलीच. शिवाय नियोजन विभागाला तातडीने जीआर काढायला लावून तो राज्यातील सर्व आमदारांना लागू केला. तसेच कोरोनावर आमदार निधीतील खर्चाची मर्यादाही त्यांनी दुप्पट म्हणजे एक कोटी रुपये केली. अशा रितीने मागितले पिंपरी-चिंचवडसाठी २५ लाख रुपये. मात्र, त्यातून राज्याला तीनशे कोटी रुपयांहून अधिक निधी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मिळणार आहे. 

जगताप यांनी केलेल्या या एका सूचनेमुळे हे शक्य झाले. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधे व साहित्य खरेदी करता येणार आहे. आपली सूचना अजित पवारांनी मान्य करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केल्याने संपूर्ण राज्यातील कोरोना विरोधातील लढाईला हे मोठे आर्थिक बळ आता मिळणार आहे, असे जगताप यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेतील २८८, तर विधान परिषदेचे एकूण ७८ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण आमदारांची संख्या ३६६ होते. त्यांना वर्षाला प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा आमदार निधी मिळतो. तो विविध विकासकामांसाठी खर्च केला जातो. आता प्रत्येक आमदाराच्या या निधीतील १ कोटी रुपये कोरोनावर खर्च  करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याव्दारे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम कोरोना विरोधातील लढाईसाठी उपलब्ध होणार आहेत.  

Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in