पद्मश्री जाहीर होताच डॉ. गिरीश प्रभूणे यांचे महापौर, आमदार, खासदारांकडून अभिनंदन

शहरवासीयांच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराने शहराच्या नावलौकिकात एक वेगळीच भर पडली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पद्मश्री जाहीर होताच डॉ. गिरीश प्रभूणे यांचे महापौर, आमदार, खासदारांकडून अभिनंदन
Girish Prabhune .jpg

पिंपरी : सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर होताच त्यांच्या अभिनंदनासाठी पिंपरी-चिंचवडमधील आमदार, खासदारांसह शहरवासियांची अभिनंदनासाठी रांग लागली आहे. शहरवासीयांच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराने शहराच्या नावलौकिकात एक वेगळीच भर पडली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

सामाजिक कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रभूणे यांना पद्मश्री जाहीर झाली अन प्रजासत्ताकदिनी त्यांच्या अभिनंदनासाठी शहरातून रांग लागली.

शिवसेनेचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, भाजपचे माजी खासदार अमर साबळे, पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, बाबू नायर, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्वीकृत नगरसेवक व शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका शारदा सोनवणे  यांनी प्रभूणेकाकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.   
 

गेल्या ३५ वर्षाच्या सामाजिक कार्याची दखल शासनाने विषय समजून घेतला : गिरीश प्रभूणे

गेली अनेक वर्षे ज्यासाठी काम करीत होतो, त्या सामाजिक कार्याला न्याय मिळाला. शासनाने हा विषय समजून घेतला. वंचित पारधी समाजाचा विषय अजून सुटलेला नाही. आता त्यांना न्याय मिळू शकतो,अशी प्रतिक्रिया गेली ३५ वर्षे राज्यातील भटक्या जमातींचे शिक्षण व पुनर्वसनासाठी अविश्रांत मेहनत करीत असलेले चिंचवड येथील पुनरुथ्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक आणि क्रांतीवर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभूणे (वय ६८)यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सरकारनामाला दिली होती. 

प्रभूणे यांच्या रुपाने हा उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल संध्याकाळी केंद्रीय गृहविभागातून त्यांना फोन आला. तुम्हाला पद्मश्री जाहीर झाला असून तो तुम्ही स्वीकारणार का अशी विचारणा त्यांना केली गेली. त्यांनी होकार देताच त्यांना तो जाहीर झाल्याची बातमी टीव्हीवर झळकली. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तो अजूनही चालूच आहे.

भाजपचे ब्रेन विनायक सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री विनोद तावडेंनीही त्यांचे खास अभिनंदन केले. यापूर्वी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल चतुरंग गौरवसह इतर दहा पुरस्कारांनी घेतलेली आहे. त्यांनी चार पुस्तकेही लिहिली आहेत. त्यातील पालावरचे जिणं या पुस्तकाच्या, तर २५ आवृत्या निघालेल्या आहेत.

वंचित समाजासाठी त्यांचे पिंपरी-चिंचवडच नाही,तर राज्यभरात काम आहे. या भटक्या जमातीतील मुलांसाठी वसतीगृहे  त्यांनी उभारली आहेत. पारधी समाजातील महिलांसाठी बचत गटाची चळवळ सुरु केली आहे. भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाचा एक अभिनव उपक्रम म्हणून त्यांच्या चिंचवड येथील पूनरुत्थान समरसता गुरुकुलमकडे पाहिले जाते. तेथे मुलांना तेथे २००६ पासून कौशल्याधिष्ठीत शिक्षणही दिले जाऊन त्यांना स्वताच्या पायावर उभे केले जात आहे.

पारधी, डोंबारी, लमाण, कोल्हाटी आदी समाजातील तीनशे वीस मुले सध्या तिथे शिक्षण घेत आहेत. १९८० मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलन भरवले. त्यात सातशे दलित साहित्यिक सहभागी झाले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता. 

महिलांच्या नावे सातबारा करून त्यांना जमिनीची मालकी व हक्क मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. शहरातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या वाड्याचे स्मारकात रुपांतर करण्यात व तसेच त्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागातील चापेकर चौकात चापेकर बंधूंचे स्मारक उभारण्यात त्यांचे योगदान आहे. दलित रंगभूमी उभारणी आणि वतन जमिनी आंदोलनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

राज्यभरात पारधी महिलांचे मेळावे घेऊन त्यांच्यावरील अत्याचार, अन्यायाबाबत त्यांनी आंदोलन केलेले आहे. या समाजील अंधश्रद्गा नष्ट करण्यासाठी त्यांनी दोन हजारावर मेळावे घेतले आहेत. अन्याय, अत्याचारामुळे धर्मांतराच्या तयारीतील नागपूर येथील पन्नास हजार पारध्यांचे धर्मांतर त्यांनी चार महिने प्रयत्न करून रोखले होते.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in