आयुक्तांच्या बदलीची मागणी करणारे तोंडावर आपटले; बढती मिळूनही हर्डीकर पिंपरीत कायम 

मर्जीतील अधिकारी आणण्याच्या हालचाली तूर्त थंडावल्या आहेत.
आयुक्तांच्या बदलीची मागणी करणारे तोंडावर आपटले; बढती मिळूनही हर्डीकर पिंपरीत कायम 
Shravan Hardikar will remain as the Commissioner of Pimpri Chinchwad

पिंपरी : गेली कित्येक दिवस होणार, होणार, अशी चर्चा असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची अखेर बदली झालीच नाही. पालिकेतील विरोधी पक्ष म्हणजे राज्याच्या सत्तेतील शिवसेना, राष्ट्रवादीने त्यांच्या बदलीची मागणी करूनही ती न होता, उलट त्यांना बुधवारी (ता. 30 डिसेंबर) सचिवपदी बढती मिळाली. एवढेच नाही तर बढतीवर इतरत्र बदली होते. मात्र, हर्डीकरांचा त्यासाठी अपवाद करून त्यांना आहे, तिथेच बढतीवर ठेवण्यात आले आहे, हे विशेष. त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर आयुक्त म्हणून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याच्या हालचाली तूर्त थंडावल्या आहेत. त्यांच्या बदलीसाठी कंबर कसलेल्यांची निराशा झाली आहे. 

उद्यापासून म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हर्डीकरांना बढतीचे नव्या वर्षाचे गिफ्ट राज्य सरकारने दिले आहे. ते गेल्या सोमवारपासून रजेवर आहेत. रजेवर असतानाच त्यांच्या बढतीचा आदेश आला. त्यांना सचिवपदी बढती देण्यात येऊन आयुक्त म्हणूनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तूर्त ते असेपर्यंत आयुक्तपदाचा दर्जा सरकारला सचिवपदापर्यंत वाढवावा लागला आहे. गेली पावणेचार वर्षे हर्डीकर हे आयुक्त म्हणून पिंपरीत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी 2017 ला हर्डीकरांना नागपूरहून पिंपरी-चिंचवडला आणले होते. 

स्मार्ट सिटीच्या कामात शहरात आयुक्तांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या संगनमताने तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने गेल्याच महिन्यात केला होता. एवढेच नाही, तर त्याबाबत नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करून आयुक्तांची बदली करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी शिवसेनेच्या एका नाही, तर तीन-तीन पदाधिकाऱ्यांनी केली होती. स्मार्ट सिटीतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीही सुरू झाल्याचे त्याबाबत तक्रार केलेले शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. 

शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीनेही आयुक्त हर्डीकर यांना सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले, त्यांचे घरगडी असे हिणवले होते. यामुळे आयुक्तांची बदली नक्की होणार, अशी चर्चा गेले काही दिवस नाही, तर काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र, त्यांची बदली सोडा, उलट बढती मिळाल्याने तो शहरभर चर्चेचा विषय झाला आहे. एवढेच नाही तर बढती देऊन त्यांना पिंपरीतच नाकावर टिच्चून ठेवण्यात आल्याने त्यांच्या बदलीची व कारवाईची मागणी केलेल्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. 

दरम्यान, गेल्या वर्षी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर काय चमत्कार झाला ते माहित नाही. परंतू आतापर्यंत भाजपच्या गळ्यातील ताईत असलेले आयुक्त एकदम त्यांनाही नकोसे झाले. त्यांचे नगरसेवकच नाही, तर कारभारी आमदारांनीही आयुक्तांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. कामे अडवून ठेवत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला. त्यामुळे त्यांनाही त्यांची बदली हवीहवीशी वाटू लागली होती. त्यात तीन वर्षांची टर्म पूर्ण झाल्याने बदली होईल, असे त्यांनाही वाटत होते. 

दोन्हींकडून टीकेचा मार झेलावा लागत असल्याने आयुक्तांनाही आता पिंपरीत राहण्याची इच्छा राहिली नव्हती. मात्र, कोरोना आला आणि सगळ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. आयुक्तांची बदली लांबणीवर पडली. बदली सोडा, आता उलट त्यांना बढती मिळाली. सहसा बढतीवर इतरत्र बदली होते. मात्र, हर्डीकर यांना आहे, तिथेच ठेवले गेले आहे, हे विशेष. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in