पक्षादेश डावलणे आले अंगलट; राहुल कलाटेंना द्यावा लागला शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा 

पक्षशिस्त मोडी नसल्याच्या भूमिकेवर कलाटे आजही ठाम आहेत.
पक्षादेश डावलणे आले अंगलट; राहुल कलाटेंना द्यावा लागला शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा 
Rahul Kalate resigns as Shiv Sena group leader

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी पक्षाची शिफारस डावलून स्वतः च्या मर्जीतील नगरसेविकेचे नाव देणे पालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याने त्यांना मंगळवारी (ता. 16 मार्च) गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. तो देण्याचा आदेश शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 24 फेब्रुवारी रोजी एसएमएसद्वारे दिला होता. 

दरम्यान, या घडामोडीमुळे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेतील गटबाजी आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात दहा महिन्यांवर पालिका निवडणूक आली असताना हा राजीनामा घेण्यात आल्याने त्याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्‍यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी एकीकडे स्वबळावर लढण्याचे मिशन-2022 शहरात सुरू केले असताना ही मोठी उलथापालथ शहर शिवसेनेत झाली आहे. 

राहुल कलाटे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी (ता. 16 मार्च) पाठवून दिला. त्यात त्यांनी राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. मात्र, यानंतर नगरसेवक आणि शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचे त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल 24 फेब्रुवारी रोजी त्यांना पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून गटनेतेपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यात गटनेतेपदी काम करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे. पक्षादेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात. त्यामुळे आपण पिंपरी चिंचवड महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर व विभागीय आयुक्तांकडे द्यावा, असे नमूद करण्यात आले होते. 

त्यावर कलाटे यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला होता. मात्र, पक्षशिस्त मोडी नसल्याच्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. गेल्या महिन्यात (ता. 18 फेब्रुवारी) स्थायी समितीवर पक्षाने सांगितलेले अश्विनी चिंचवडे यांचे नाव न देता मीनल यादव यांची वर्णी लावल्याबद्दल पक्षाने त्यांना ही नोटीस बजावली होती. मात्र, स्थायी सदस्य पदासाठी इच्छूक म्हणून फक्त पक्षाच्या तीन नगरसेवकांनी माझ्याकडे अर्ज केले होते. त्यात चिंचवडे यांचा अर्ज आलेला नव्हता. तसेच, स्थायी सदस्य म्हणून कुणाचे नाव द्यायचे याबाबतचा निरोप वरिष्ठांकडून 18 तारखेला पालिका सभा सुरु होईपर्यंत आलेला नव्हता, असे कलाटे यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in