Pimpri Golden Man Shankar Kurhade Wearing Mask Made of Gold | Sarkarnama

पिंपरीच्या या 'गोल्डन मॅन'ने बनवला सोन्याचा मास्क! (व्हिडिओ)

दिलीप कांबळे
शुक्रवार, 3 जुलै 2020

पिंपरी चिंचवडचे नवे 'गोल्डन मॅन' शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचे मास्क घालून शहरात मिरवताहेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये.

पिंपरी :  पिंपरी चिंचवडचे नवे 'गोल्डन मॅन' शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचे मास्क घालून शहरात मिरवताहेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये. कोरोनाच्या महामरातीत बनवलेल्या त्यांच्या या मास्कमुळं सध्या उलट-सुलट चर्चा ही आहे. पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत. ते म्हणतात चर्चा तर होणारच....

कुऱ्हाडे यांना सोन्याचा मोठा शौक. त्यातच त्यांनी सोशल मिडियावर एक व्यक्ती चांदीचा मास्क घालून फिरतानाची क्लिप पाहिली. मग आपण सोन्याचा मास्क का बनवू नये, असे त्यांना वाटले आणि त्यांनी तो बनवून वापरायला सुरुवातही केली. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये त्यांनी खर्ची घातलेत. 

हे होते आधीचे तीन 'गोल्डन मॅन'

पुण्यातील पहिला गोल्डन मॅन म्हणजे दिवंगत आमदार रमेश वांजळे. वांजळे हे पहिलवान होते. राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली सोन्याची हौस पूर्ण करायला सुरवात केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांचा आकार आणि वजन दिवसेंदिवस वाढत गेले. त्यातून त्यांची चर्चा होऊ लागली. धिप्पाड देह, पहिलवानी शरीर, दाढी आणि त्यावर सोन्याचे  वजनदार दागिने यामुळे वांजळे यांचा रुबाब लगेच सामान्यांच्या लक्षात येऊ लागला. त्यांची क्रेझच निर्माण झाली. नंतर त्यांचे दुर्दैवाने निधन झासले.

2012 मध्ये राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवला. त्यावर सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याच्या चेन, कडे असा पोषाख केला. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची ख्याती झाली. त्याची गिनेज बुकमध्ये नोंदही झाली. मात्र या फुगे यांचा दुर्देवी अंत झाला. ते फायनान्स स्किम राबवत होते. तसेच एका पतसंस्थेतही ते पदाधिकारी होते. त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. 

पुण्यातील तिसरा प्रसिद्ध गोल्डनमॅन व उद्योजक म्हणजे सम्राट हिरामण मोझे. माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे ते पुतणे होत. सम्राट यांची अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची स्टाईल वेगळी होती. सुमारे ८ ते १०  किलो सोने ते अंगावर घालत. त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन, असे नाव पडले होते. सम्राट यांची दखल दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ही घेतली होती. सम्राट सध्या पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख