पिंपरी भाजपत फाटाफूट; लांडगेंचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रवादी म्हणतेय 'सांगली' घडवू 

राजीनाम्यानंतर त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पिंपरी भाजपत फाटाफूट; लांडगेंचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रवादी म्हणतेय 'सांगली' घडवू 
Pimpri BJP split over standing committee chairmanship candidature

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार महेश लांडगे यांच्या गटाचे ऍड. नितीन लांडगे यांचं नाव निश्‍चित झाल्याची घोषणा होताच पक्षातील दुसरे प्रबळ इच्छूक नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

दरम्यान, सत्ताधारी भाजपमधील या बंडाळीचा फायदा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रवीण भालेकर यांना स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. "आम्ही सांगली महापालिकेसारखा पिंपरी चिंचवडमध्ये चमत्कार करू' असा दावा त्यांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात गेलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर नवे आणि जुने भाजप नेते यांच्यात सत्तापदावरून कुरबुरी सुरू झाल्या. मात्र, त्या तेवढ्याशा प्रकर्षाने पुढे येत नव्हत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड भाजपमधील संदोपसुंदी उघड होत आहे. 

सुरुवातीला महापौरपद लांडगे गटाकडे होते, त्यानंतर ते जगताप गटाकडे देण्यात आले. त्याच न्यायाने स्थायीसह इतर पदांचे वाटप झाले होते. मागच्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद हे आमदार लांडगे समर्थक संतोष लोंढे यांच्याकडे होते. त्यामुळे तसेच आगामी निवडणूक पाहता या पदावर इतर मतदारसंघातील नगरसेवकांना संधी मिळेल, अशी अनेकांना आशा होती. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लांडगे यांनी आपली ताकद लावून निवडणुकीच्या तोंडावर पालिकेच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात यश मिळविले. 

दरम्यान, गेल्या 18 तारखेच्या सभेत स्थायी समितीवर निवड झालेले भाजपचे रवी लांडगे यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. जुने एकनिष्ठ भाजपचे सदस्य असलेल्या लांडगे यांना गेल्या चार वर्षांत एकही पद मिळाले नव्हते. दुसरीकडे, आमदार जगताप यांचे कट्टर पाठीराखे ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनाही संधी न मिळाल्याने त्यांचीही निराशा झाली आहे. त्यांनाही गेल्या चार वर्षांत कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. काटे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी लांडगे यांनी राजीनामा देऊन उघड नाराजी व्यक्त करत आमदार महेश लांडगे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. 

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडून प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या शुक्रवारी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सांगलीची पुनरावृत्ती घडवू, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सोपी वाटणारी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक रंजक होण्याची चिन्हे आहेत. 

एकूणच ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरणही चांगलंच तापल्याचं बघायला मिळत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in