दोन 'दादा' एकत्र आलेच नाहीत!

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रधानमंत्री आवास योजनेची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते निघणारी सोडत पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे त्याविरोधातील आंदोलन आणि प्रशासनाचे असहकार्य यामुळे ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की पालिकेतील सत्ताधारी भाजपवर ओढवली.
दोन 'दादा' एकत्र आलेच नाहीत!
Ajit Pawar - Chandrakant Patil

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रधानमंत्री आवास  योजनेची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  निघणारी सोडत पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे त्याविरोधातील आंदोलन आणि प्रशासनाचे असहकार्य यामुळे ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की पालिकेतील सत्ताधारी भाजपवर ओढवली.

त्यामुळे या सोडतीनिमित्त एकत्र येणारे चंद्रकांतदादा व अजितदादा पवार हे एका व्यासपीठावर येण्याचा मुहूर्तही टळला. देवेंद्र फडणवीस व अजितदादा हे नुकतेच पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र आल्याने हे दोन्ही दादाही एकत्र येणार का याकडे लक्ष लागले होते.

सोडतीला अजितदादा प्रमुख पाहुणे होते.तर, चंद्रकांतदादांच्या हस्ते ती काढण्यात येणार होती. मात्र,राजशिष्टाचारानुसार ती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानेअजितदादांच्याच हस्ते काढण्याची राष्ट्रवादीची मागणी होती. अन्यथा ती होऊ न देण्याचा इशाराही पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांनी दिला होता. तसेच शहरासाठी काडीचेही योगदान नसलेल्या चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ही सोडत काढण्यास राष्ट्रवादीचा विरोध होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि योजनेचे फक्त वीस टक्केच काम झाल्याने फक्त श्रेय लाटण्याकरिता सत्ताधारी भाजप ही सोडत काढत असल्याचे मिसाळ यांचे म्हणणे होते. 

त्यामुळे राष्ट्रवादीने सोडतीच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवीत आंदोलन सुरु केले. दुसरीकडे प्रशासनाचा एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपला ही सोडत ऐनवेळी रद्द करावी लागली. परिणामी सोडतीसाठी आलेल्या या योजनेतील अर्जदारांचा हिरमोड झाला.राजकीय दबावातून प्रशासनाने माघार घेतल्याने सोडत रद्द झाली, असा आरोप पालिकेतील सत्तारुढ भाजपचे नेते नामदेव ढाके यांनी सरकारनामाशी बोलताना केला. राष्ट्रवादीच्या काळ्या झेंड्यांच्या आंदोलनाला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, राजशिष्टाचाराचा भंग होतअसल्याचे सकृतदर्शनी आढळल्याने ही सोडत रद्द केल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

त्याबद्दल त्यांनी लोकप्रतिनिधी व जमलेल्या शहरवासियांची माफी मागितली.तर, आंदोलनाचे हे यश असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला.सदर संगणकीय सोडतीस आमचा विरोध नव्हता, परंतु राजकीय शिष्टाचार सोडून ती आयोजित केल्याने विरोध करावा लागला,असे मिसाळ यांनी सांगितले. अजितदादा व आमचा पक्ष विकासकामात कधीही राजकारण करीत नाही व करणारही नाही,असे ते म्हणाले. भविष्यात सुध्दा पालिकेच्या कार्यक्रमात राजशिष्ट्राचाराप्रमाणे अजितदादांना निमंत्रित केले नाही,तर पुन्हा आदोलंन केले जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे. या सोडतीचा ड्रॉ हा सेट केला गेला होता,असा आरोप त्यांनी केला. मात्र, आम्ही तो उधळून लावला, असे ते म्हणाले. भाजपची ही डीजीटल चोरी चालणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in