पिंपरी -चिंचवड उपमहापौरपदासाठी 'दादा' 'भाऊं'च्या गटात रस्सीखेच

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक सव्वा वर्षावर आल्याने उपमहापौरपद निवडणुकीलाही यावेळी महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आपल्याच समर्थकाला बसविण्यासाठी आमदार दादा आणि भाऊंच्या गटात (अनुक्रमे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप)रस्सीखेच सुरु झाली आहे
पिंपरी -चिंचवड उपमहापौरपदासाठी 'दादा' 'भाऊं'च्या गटात रस्सीखेच
Mahesh Landge - Laxman Jagtap

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक सव्वा वर्षावर आल्याने उपमहापौरपद निवडणुकीलाही यावेळी महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आपल्याच समर्थकाला बसविण्यासाठी आमदार दादा आणि भाऊंच्या गटात (अनुक्रमे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप)रस्सीखेच सुरु झाली आहे. येत्या शुक्रवारी (ता.६) ही निवडणूक होत आहे.

महापौरपद भाऊंच्या चिंचवडकडे असल्याने उपमहापौरपद दादांच्या भोसरीकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या हे पद पिंपरीकडे होते. आगामी पालिका निवडणुकीचे बेरजेचे राजकारण व त्यापूर्वी उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर महापौरपदाचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. सभागृहनेताही नवा मिळू शकतो. त्यात पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांची फेब्रुवारीत एक वर्षाची मुदत संपून नवा अध्यक्ष मिळणार आहे. या तिन्ही महत्वाच्या व मोठ्या पदांच्या निवडीची झालर उपमहापौरपद निवडणुकीला आहे.

फेब्रुवारी २०१७ ला पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीची १५ वर्षाची मक्तेदारी मोडीत काढून भाजप प्रथमच सत्तेत आली. प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून त्यांनी पदाधिकारी कालावधी निश्चीत केला.त्यानुसार आतापर्यंत तीन उपममहापौर झाले आहेत.त्या प्रत्येकवेळी या पदासाठी कसलीही चुरस वा रस्सीखेच दिसून आली नाही. नुकतेच राजीनामा दिलेले उपमहापौर तुषार हिंगे यांना,तर ते क्रीडा समिती सभापती असतानाही या पदाची लॉटरी लागली. मात्र, त्यांनीच या पदाला मोठे वलय आपल्या छोट्याशा ठरवून दिलेल्या कारकिर्दीत प्राप्त करून दिले. 

फेब्रुवारी २०२२ मध्ये पालिका निवडणूक आहे. त्यापूर्वी या पदाची या टर्ममधील ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी फायदा घेण्याकरिता शहराचे कारभारी असलेल्या भाऊ व दादा गटांनी हे पद आपल्याकडे घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.मात्र, महापौरपद (माई ढोरे)हे सध्या भाऊंच्या चिंचवड मतदारसंघात आहे. त्यामुळे उपमहापौरपदासाठी दादांच्या भोसरीचा दावा बळकट झाला आहे.

सध्या हे पद हिंगे यांच्या रुपाने शहरातील तीनपैकी पिंपरी या विधानसभा मतदारसंघाकडे होते. दुसरीकडे पिंपरीतून दुसरे कोणी नगरसेवक या  पदासाठी इच्छूक नाहीत. तर, तेथील दोन प्रबळ नगरसेवकांना हे पद कारभारी देण्यास तयार नाहीत. पहिल्या उपमहापौर सौ. शैलजा मोरे या पिंपरी मतदारसंघातीलच होत्या. दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला आहे. त्यामुळे तिथे हे पद देण्यास शहरातील भाजपचे दोन्ही कारभारी आमदार तयार नसल्याचे समजते.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in