पिंपरी : राज्यातील पहिल्या हरिण उद्यानासाठी (डिअर पार्क) राज्य सरकारने आपल्या मालकीची शंभर कोटी रुपयांची ५९ एकर गायरान जमिन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे विनामोबदला हस्तांतरित करण्याचा जीआर काढला आहे. त्यावरून पालिकेतील सत्ताधारी भाजपचे भोसरीचे आमदार व शहराचे कारभारी महेश लांडगे आणि विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांच्यात श्रेयाची लढाई रंगली आहे.
आपल्याच पाठपुराव्यामुळे हे हस्तांतरण झाल्याचा दावा दोघांनीही केला आहे. तर, पालिका आय़ुक्तांच्या विनंतीवरून हे हस्तांतरण झाल्याचे शासकीय आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाच्या या जीआरची प्रत मुंबईत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भालेकर यांच्याकडे दिली. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्याच पाठपुराव्यामुळे हे जमीन हस्तांतरण झाल्याचे सांगत त्याच्या पुष्ठ्यर्थ पत्रव्यवहारही सादर केला. हे समजताच महेशदादा यांनीही आपल्याच पाठपुराव्यामुळे हे काम झाल्याचा दावा लगेचच केला.
काल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील व भालेकर यांनी त्यासाठी पत्रकार परिषदच घेतली.
महापालिकेच्या इतिहासात शासनाकडून विनामोबदला हस्तांतरित झालेले हे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचे भालेकर यांनी सांगितले. त्यामुळे तळवडे येथील या जागेवर मनपामार्फत पर्यावरण पुरक उद्यान व मैदान विकसित करण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे ते म्हणाले. तर, मतदारसंघातील या जागेसाठी २०१६ पासून आपला पाठपुरावा सुरु होता, असा दावा महेशदादांनीही केला आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगारात वाढ होईल, असे ते म्हणाले. रेड झोनची ही जागा असल्याने तेथे कसलेही बांधकाम करता येणार नाही.
`दिल्ली`च्या आंदोलनाला महाराष्ट्रातून दहा हजार लढवय्यांची कुमक! https://t.co/E70CIdRSZd
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 19, 2020
हेही वाचा : निवडणूक बिनविरोध करा.. 21 लाख मिळवा..
पिंपरी : बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीला बक्षीस देण्याची राज्यात आता शर्यतच सुरु झाली आहे. हे वारे आता मावळात (जि.पुणे) पोचले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी ११ लाख रुपये देण्याची घोषणा आज केली. त्याजोडीने विकासकामांना प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दहा लाख निधी असे एकूण २१ लाख रुपये मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत गावकी, भावकी, गटातटाचे वाद न होता त्या बिनविरोध व्हाव्यात, अशी शेळके यांची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या धर्तीवर 'माझं गाव, माझा स्वाभिमान' अभियान हाती घेतले आहे.

