राजकीय समतोल साधत 'हे' आमदार ठरताहेत 'मॅन ऑफ कमिटमेंट'
4Sarkarnama_20Banner_20_287_29_9.jpg

राजकीय समतोल साधत 'हे' आमदार ठरताहेत 'मॅन ऑफ कमिटमेंट'

पिंपरी चिंचवड महापालिकास्थायी समिती अध्यक्षपदासाठी ऍड. नितीन लांडगे यांच्या उमेदवारी देण्यात आली आहे.

पिंपरी : समर्थक नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर अचूक संधी देत आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी- चिंचवडमधील राजकीय पटलावर आतापर्यंत गेल्या ४ वर्षांत राजकीय समतोल साधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्याचा पुर्नप्रत्यय स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ऍड. नितीन लांडगे यांच्या उमेदवारीतून आज पुन्हा आला. त्यामुळे शहरातील राजकारणात आमदार लांडगे 'मॅन ऑफ कमिटमेंट' ठरताना दिसत आहेत.

२०१७ मध्ये पिंपरी पालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार लांडगे यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पालिकेतील पदवाटप करताना समान न्याय देण्यात येईल, असा शब्द आमदार लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना दिला होता. त्यातूनच समाविष्ट गावातील पहिला महापौर म्हणून नितीन काळजे, त्यांनतर माळी समाजाचे नेतृत्व करणारे राहुल जाधव यांनाही महापौरपदी त्यांनी संधी दिली. 

ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देत त्यांनी 'मास्टर स्ट्रोक' लगावला. कारण, समाविष्ट गावांसह भोसरीलाही राजकीय न्याय देण्याची त्यांची भूमिका त्यातून अधोरेखित झाली. माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या नियुक्तीला समर्थन देत लांडगे यांनी स्थानिक आणि बाहेरचा वादालाही खूबीने तिलांजली दिली. त्यांनतर महापालिका स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, विधी समिती आदी महत्वाच्या समितीवर समर्थक नगरसेवकांना संधी दिल्याने पदवाटपात राजकीय समतोल पाहायला मिळाला.

पिंपरी चिंचवड पालिकेत पदवाटपात जातीय समतोल...
आमदार लांडगे यांनी मराठा समाजाचे नितीन काळजे, माळी समाजाचे राहुल जाधव यांना सुरवातीला सव्वा- सव्वा वर्ष महापौरपद दिले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदी ब्राह्मण समाजाचे विलास मडीगेरी, माळी समाजाचे संतोष लोंढे तसेच अनुसूचित जातीच्या सीमा सावळे यांना स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. समाविष्ट गावांसह भोसरी गावातील मतदारही निर्णायक आहेत. त्यामुळे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पुत्र आणि ऍड. नितीन लांडगे यांना आज स्थायी समिती अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा प्रतिनिधित्व दिल्याचे स्पष्ट होते. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांना मानणारा मोठा मतदार भोसरीत आहे. पण, राष्ट्रवादीच्या काळात लांडगे यांच्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, नितीन लांडगे यांना न्याय देत आमदार महेश लांडगे यांनी राजकीय समयसुचकता दाखवल्याची चर्चा आहे. पंचक्रोशीत माजी आमदार लांडगे यांना पुन्हा राजकीय पटलावर मानपान मिळाल्याने त्याचा राजकीय फायदा आमदार लांडगे यांना होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in