मावळमधून खासदार व्हायचय; समोर पार्थ असोत की बारणे

राजकारणात प्रत्येकाला पुढे जायची इच्छा असते. त्यामुळे मलाही दिल्लीला जायला आवडेल.
 Laxman Jagtap .jpg
Laxman Jagtap .jpg

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून २०२४ ला लढायला आवडेल, मग समोर प्रतिस्पर्धी पार्थ अजित पवार असो वा इतर कुणीही, असे सांगत पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) कारभारी आणि चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (Laxman Jagtap) यांनी खासदारकीसाठी आताच रणशिंग फुंकले. मात्र, हे पक्षावर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'सरकारनामा'ला दिलेल्या खास मुलाखतीत भाऊंनी लोकसभा लढण्याचा मानस व्यक्त केला. (MLA Jagtap started preparing for the Lok Sabha elections) 

राजकारणात प्रत्येकाला पुढे जायची इच्छा असते. त्यामुळे मलाही दिल्लीला जायला आवडेल. पण, ते पक्षावर अवलंबून आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले. हा मनसुबा जाहीर करताना त्यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि मावळचे विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना आताच जणूकाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भाजपने, जर जगतापांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी दिली, तर २०२४ मधील ही लढत राज्यात लक्षवेधी ठरेल. कारण बारणे हे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत राहतील. तर ती हुकविण्याकरिता जगतापांकडून आटोकाट प्रयत्न होतील. गत लोकसभेला जगताप यांच्या नावाची चर्चा होती. पण, शिवसेनेबरोबर भाजपची युती झाल्याने व विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेनेकडेच राहिली. 

त्यानंतर झालेल्या विधानसभेला युती तुटली. आता, तर २५ वर्षे जानी दोस्त असलेले भाजप, शिवसेना हे आता जानी दुश्मन बनले आहेत. त्यांच्यातून सध्या विस्तवही जात नसल्याने आगामी लोकसभेला त्यांच्यात युती होण्याची शक्यता दिसत नाही. दुसरीकडे २०१९ ला राज्यात भाजपची जवळपास आलेली सत्ता ऐनवेळी राजकीय समीकरणे उलटीपालटी झाल्याने शेवटच्या क्षणी गेली. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची व पर्यायाने जगतापांची मंत्रीपदाची संधीही गेली. त्यामुळेच त्यांनी आता खासदारकीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. 

येत्या फेब्रुवारीत होऊ घातलेल्या पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा भाजप बहूमताने विजयी होईल, असा दावाही जगताप यांनी केला आहे. विरोधकांनी गेल्या तीस वर्षात केले नाही, ते आम्ही पाच वर्षात केल्याने पुन्हा विजयी होऊ, गतवेळपेक्षा (२०१७) यावेळी म्हणजे २०२२ ला पालिकेत जास्त जागा मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १२८ नगरसेवक असलेल्या पिंपरी पालिकेत २०१७ ला भाजपचे ७७ सदस्य निवडून आले आहेत. पूर्वीसारखे गावकीभावकीचे राजकारण तेवढ्या प्रमाणात शहरात राहिले नसल्याने गाववाल्यांखेरीज काही नवे चेहरे २०२२ च्या पालिका सभागृहात दिसतील, असे ते म्हणाले. 

गतवेळी २०१७ पालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करूनही गप्प का राहिलात असे विचारले असता त्यासंदर्भातील सत्यस्थिती कळण्यास उशीर झाल्याने हे घडल्याचे त्यांनी सांगितले. गत टर्मला मंत्रीपद हुकल्याची खंत त्यांच्या बोलण्यात यावेळी स्पष्टपणे जाणवली. प्राधिकरण विलिनीकरणाचा राज्य सरकारचा निर्णय पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने शंभर टक्के चुकीचाच असल्याने ते त्यावर नाराज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पीएमआरडीएला उत्पन्नाचा मार्ग नसल्याने निव्वळ त्यासाठी प्राधिकरण विलिनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

५८ वर्षीय जगतापांची २३ व्या वर्षी राजकीय कारकिर्द पिंपरी पालिकेपासून सुरु झाली. १९८६ ला ते कॉंग्रेसचे नगरसेवक झाले. १९९९ ला ते राष्ट्रवादीत गेले. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले. २००४ ला राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर गेले. २००९ ला ते अपक्ष म्हणून पुन्हा विधानपरिषदेवर निवडून आले. २०१४ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्या पक्षाकडून ते चिंचवडमधून विधानसभेवर निवडून आले. २०१९ ला चिंचवडमधूनच ते पुन्हा भाजपचे आमदार झाले. तर, २०२४ भाजपकडूनच लोकसभा लढण्याच्या तयारीत ते आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com