निवडणुका चालतात..मग फक्त शिवजयंतीवरच निर्बंध का.. 
vp14.jpg

निवडणुका चालतात..मग फक्त शिवजयंतीवरच निर्बंध का.. 

राज्य सरकारने एक परिपत्रक काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध आणले आहेत.

पिंपरी : सरकारला विधानपरिषद निवडणूक चालते... मेळावे चालतात. त्याला होणारी गर्दी चालते, ग्रामपंचायत निवडणुका चालतात..मग, शिवाजीमहाराजांची जयंतीच का चालत नाही ? तिच्यावरच निर्बंध का अशी थेट विचारणा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे. हे निर्बंध रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक परिपत्रक काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध आणले आहेत. तसेच ती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहनही केले आहे. त्यावर राज्यभरातून शिवभक्तांच्या तीव्र प्रतक्रिया येत आहेत. त्याअनुषंगाने सद्यस्थितीत आम्हीही शिवजयंती साध्या पद्धतीने, शांततेत साजरी केली असती, असे पाटील म्हणाले. पण, मग सरकारला विधानपरषदेच्या निवडणुका कशा चालतात. मेळावेही भरले जातात. त्याला गर्दी होते, ग्रामपंचायत निवडणुकही होते. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु होतात. तर, मग शिवजयंतीच सरकारला का चालत नाही असा सरकारला कोंडीत पकडणारा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आमचं, तर असं म्हणणं आहे की तिथीनुसार शिवजयंतीचा आग्रह सोडून शिवसेनेने तारखेनुसारच्या शिवजयंतीमध्ये सहभागी होऊन एकच शिवजयंती साजरी करावी, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

यंदा शिवजयंतीवर कोरोनाचं सावट आहे. गृहमंत्र्यालयानं काढलेल्या आदेशामुळे शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नेते आक्रमण झाले आहेत. दोन दिवसापासून राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. यामुळे राज्य सरकारनं नवा आदेश काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही नियम व अटी घातल्या आहेत. यावर भाजपचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  
शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे. एल्गार परिषदेचा परवानगी मग शिवजयंतीला का नाही, असा सवाल कदम यांनी राज्य सरकारला केला आहे. याबाबत राम कदम यांनी टि्वट करीत राज्य सरकारला जाब विचारला आहे. 

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही ? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का,' असं टि्वट कदम यांनी केलं आहे.  

राम कदम म्हणाले की, काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला. मात्र राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. तरीही सरकार गप्प बसलं आहे. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in