दिल्लीतील आंदोलनासाठी 300 रुपये भाड्याने माणसे आणली : भाजपच्या उपमहापौरांनी तोडले तारे 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान व चीनमधून रसद पुरवठा होत आहे.
दिल्लीतील आंदोलनासाठी 300 रुपये भाड्याने माणसे आणली : भाजपच्या उपमहापौरांनी तोडले तारे 
Bring hired men for agitation in Delhi : pimpri chinchwad BJP deputy mayor alleges

पिंपरी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान व चीनमधून रसद पुरवठा होत असल्याचा खळबळजनक आरोप पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आज (ता. 8 डिसेंबर) महापालिका सभेत केला. त्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षांनी सभात्याग केला. दिल्लीतील आंदोलनासाठी तीनशे रुपये देऊन भाड्याने आंदोलक आणल्याचे विधानसुद्धा उपमहापौरानी केले. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आजच्या भारत बंदचे जोरदार पडसाद पिंपरी चिंचवड शहर तसेच महापालिकेच्या आजच्या सभेतही उमटले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हे काळे कपडे, तर इतर विरोधी नगरसेवक दंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोदी सरकार हाय हाय आणि जय जवान, जय किसान अशा घोषणा देत सभागृहात आले. 

देशभर बंद असल्याने आजची सभा उद्यापर्यंत (ता. 9 डिसेंबर) स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने ती फेटाळत कामकाज रेटून नेले. ते करताना उपमहापौर घोळवे यांच्या वक्तव्याची भर पडली. परिणामी संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी सभा तहकूब करण्याबाबत मतदान घेण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या मंगला कदम यांनी केलेली मागणीही फेटाळून लावण्यात आली. 

कामगार नेते असलेल्या उपमहापौर केशव घोळवे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य हा शेतकरीच नव्हे, तर कामगारांचाही अवमान आहे, असा आरोप मिसाळ व कदम यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला. भाजपची हुकुमशाही आजही दिसली. त्यांना कामकाज कसे करायचे, हेच माहीत नसल्याचा हल्लाबोल या दोघांनी केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in