एका पूलाचे दोनदा उदघाटन...पिंपरीत हॅटट्रिक - Bridge in PCMC Inagurated twice by Two political Parties | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

एका पूलाचे दोनदा उदघाटन...पिंपरीत हॅटट्रिक

उत्तम कुटे
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

दोनदा उदघाटन झालेला हा शहरातील पहिलाच पूल नाही. तर असे भाग्य शहरातील तीन पूलांना गेल्या दोन वर्षात लाभलेले आहे. ही आगळी हॅटट्रिक केलेले उद्योगनगरी हे देशातील बहूधा पहिलेच शहर असेल. या तीन पूलापैकी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जगताप डेअरी चौकातील पूलाचे,तर चक्क तीनदा उदघाटन केल्याचा विक्रम झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील एका पूलाचे २४ तासाच्या आत दोनदा उदघाटन झाल्याने तो आज शहरभर चर्चेचा विषय झाला. निगडी येथील भक्तीशक्ती चौकातील उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊनही तो खुला केला जात नसल्याने स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादीने काल या पूलाचे उदघाटन केले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सत्ताधारी भाजपने २४ तासाच्या आतच आज महापौर माई ढोरेंच्या हस्ते पुन्हा त्याचे उदघाटन केले.

दोनदा उदघाटन झालेला हा शहरातील पहिलाच पूल नाही. तर असे भाग्य शहरातील तीन पूलांना गेल्या दोन वर्षात लाभलेले आहे. ही आगळी हॅटट्रिक केलेले उद्योगनगरी हे देशातील बहूधा पहिलेच शहर असेल. या तीन पूलापैकी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जगताप डेअरी चौकातील पूलाचे,तर चक्क तीनदा उदघाटन केल्याचा विक्रम झाला आहे.

शहराच्या पश्चिम हद्दीवर लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या अशा भक्तीशक्ती चौकातील पूलाचे काम पूर्ण होऊनही तो खुला केला गेला नव्हता. त्यामुळे स्थानिकांनाच नव्हे,तर मावळात,लोणावळा तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांना वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व पदाधिकाऱ्यांनी काल त्याचे उदघाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर आज महापौर माई ढोरे यांनी पुन्हा त्याचे औपचारिक उदघाटन केले. त्यामुळे एकाच पूलाच्या दोनदा उदघाटनाचा हा  विषय आज शहरात चवीने चघळला जात असल्याचे पाहायला मिळाले.

भाजप २०१७ ला प्रथमच पालिकेत सत्तेत आल्यानंतर श्रेयबाजीचे हे राजकारण तथा एकाच विकासकामाची एकदा नाही,तर दोनदा उदघाटने करण्याचा धडाका सुरु झाला. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मंजूर होऊन सुरु झालेल्या  विकासकामांच्या उदघाटनाला नवे सत्ताधारी हे जुन्यांना डावलू लागल्याने हा डबल उदघाटनाचा खेळ सुरु झाला. आपल्या नेत्याला म्हणजे शहराच्या जुन्या कारभाऱ्यांनाही त्यासाठी बोलवावे,अशी राष्ट्रवादीची मागणी होती. तर, नव्या सत्ताधाऱ्यांचा ही उदघाटने आपल्या व शहराच्या नव्या कारभाऱ्यांच्या हस्ते करण्याचा अट्टाहास कायम होता.

त्यातून प्रथम राष्ट्रवादीने पुण्याला जोडणाऱ्या दापोडी येथील मूळा-मुठा नद्यांच्या संगमावरील समांतर पूलाचे उदघाटन गेल्यावर्षी आपल्या शहराध्यक्षांच्या हस्ते ईदच्या दिवशी केले. कारण दुहेरी वाहतूक होत असलेल्या तेथील ब्रिटीशकालीन जुन्या पूलावरील ताण वाढल्याने नवा लवकर सुरु होणे गरजेचे होते. मात्र,काम पूर्ण होऊनही तो खुला केला गेला नव्हता. त्यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी हा पूल राष्ट्रवादीने खुला केला. मात्र,त्यानंतर भाजपने बुलडोझरने पूलावर माती टाकून व बुलडोझरच आडवा लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.

नंतर दोन दिवसांनी शहराचे कारभारी आमदार भाजपचे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते या पुलाचे पुन्हा उदघाटन केले गेले होते. यावर्षी फेब्रुवारीत कोरोना पसरण्यापूर्वी उदघाटन झालेला प्राधिकरणाचा0 जगताप डेअरी येथील पूल,तर तिहेरी भाग्यवान ठरला. प्रथम वाघेरे यांनी त्याचे (एक लेन) उदघाटन केल्यानंतर पुन्हा महापौरांनी (दुसरी लेन) केले. तर, प्राधिकरणाने नंतर अजित पवार यांच्या हस्ते त्याचे तिसऱ्यांदा उदघाटन केले होते.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख