मोदी सरकारविरोधातील आंदोलनात भाजपचे उपमहापौरही सामील 

या आंदोलनात उपमहापौर घोळवे सामीलच झाले नाही, तर त्यांनी भाषणसुद्धा केले.
मोदी सरकारविरोधातील आंदोलनात भाजपचे उपमहापौरही सामील 
BJP Pimpri-Chinchwad's Deputy Mayor also joins the agitation against Modi government

पिंपरी : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कामगार कायद्याविरोधात विविध कामगार संघटनांनी आज (ता. 26 नोव्हेंबर) पुकारलेल्या देशव्यापी संप आणि आंदोलनात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे उपमहापौर केशव घोळवे सामील झाले. शहरात तो एकच चर्चेचा विषय झाला. एवढेच नाही, तर या कायद्यांमुळे कामगारांमध्ये संताप असल्याचे सांगत त्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही उपमहापौर घोळवे यांनी केली. भाजपला मिळालेल्या या घरच्या आहेराची चर्चा झाली नसती, तर नवलच. 

प्रचलित कामगार कायदे बदलून चार नवे सुटसुटीत कामगार कायदे नुकतेच केंद्राने आणले आहेत. मात्र, ते कामगारवरोधी आणि भांडवलदारधार्जिणे असल्याने त्याविरोधात देशभरातील कामगारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे नवे कायदे मागे घेऊन जुनेच ठेवावेत, या मागणीसाठी आज विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संप आणि आंदोलन केले. 

त्याअंतर्गत उद्योगनगरीतही पुणे जिल्हा कामगार संघटना कृती समितीने तीव्र आंदोलन केले. त्यात केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात उपमहापौर घोळवे सामीलच झाले नाही, तर त्यांनी भाषणसुद्धा केले. या नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारवर्गात संतापाची लाट असल्याचे सांगत त्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, याबाबत पंतप्रधान आणि केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे तीव्र स्वरुपात म्हणणे मांडू, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपचाच पदाधिकारी भाजप सरकारविरोधात बोलल्याने उपस्थित कामगारांमध्ये तो मोठा चर्चेचा विषय झाला. या संदर्भात उपमहापौरांची बाजू ऐकण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ऊसतोड कामगाराचे पुत्र असलेले घोळवे हे कामगार नेते असून त्यांची श्रमिक एकता महासंघ ही कामगार संघटनाही आहे. त्यामुळे कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी या आंदोलनाला हजेरी लावली असल्याचा अंदाज आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in