उपमहापौरांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले पिंपरी भाजप शहराध्यक्ष? - All Corporators will get Equal Opportunity say Mahesh Landge | Politics Marathi News - Sarkarnama

उपमहापौरांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले पिंपरी भाजप शहराध्यक्ष?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. पाच वर्षांच्या सत्ताकाळात प्रत्येक नगरसेवकाला पद वाटपात संधी देण्याची भूमिका भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. त्यामुळे तुषार हिंगे यांना उपमहापौर पदी संधी मिळाली होती. सुमारे ११ महिने हिंगे यांनी उपमहापौर म्हणून कार्यकाळ गाजवला आहे, असे महेश लांडगे यांनी सांगितले

पिंपरी : शहराचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपल्या कार्यकाळात लक्षवेधी कामगिरी केली. पण, पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पद वाटपात समान न्याय मिळावा, असे सूत्र ठरले होते. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. 

पिंपरी- चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे उपमहापौर हिंगे यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते. याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. पाच वर्षांच्या सत्ताकाळात प्रत्येक नगरसेवकाला पद वाटपात संधी देण्याची भूमिका भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. त्यामुळे तुषार हिंगे यांना उपमहापौर पदी संधी मिळाली होती. सुमारे ११ महिने हिंगे यांनी उपमहापौर म्हणून कार्यकाळ गाजवला आहे. 

कोरोना काळात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हिंगे यांनी 'अटल थाळी' सुरू केली होती. 'कम्युनिटी किचन' च्या गरजू नागरिकांना अन्न वाटप केले होते. प्रभागासह शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली, असेही लांडगे यांनी म्हटले  आहे. 

तुषार हिंगे म्हणाले की, पक्षाने मला क्रीडा समिती सभापती तसेच उपमहापौरपद दिले. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. दोन्ही पदांवर पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि पक्ष धोरणाशी सुसंगत काम करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या धोरणानुसार सर्वांना संधी मिळावी म्हणून पदाचा कार्यकाळ एका वर्षांचा निश्‍चित केला आहे. मला वर्षापेक्षा अधिक काळ पद भूषविण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मी राजीनामा दिला आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख