लाल किल्ल्यावरील तिरंगा काढून तिथे दुसरा झेंडा फडकाविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कोणी दिला? - Who gave the farmers the right to remove the tricolor from the Red Fort and hoist another flag there? : Dr. Shripal Sabnis | Politics Marathi News - Sarkarnama

लाल किल्ल्यावरील तिरंगा काढून तिथे दुसरा झेंडा फडकाविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कोणी दिला?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

हा अन्नदाताही आज चुकला.

भोसरी (जि. पुणे) : शेतकऱ्यांचा खोटा आव आणणारे राजकीय पुढारी दिल्लीत सगळीकडे आज दिसत आहेत. ते सत्ताधारी नालायक असोत की विरोधी पक्षातले कोणी असोत. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संबंधाच्या अस्मितेचा, त्यांच्या भाकरीचा. शेतकरी हा अन्नदाता आहे. हा अन्नदाताही आज चुकला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील तिरंगा काढून दुसरा झेंडा फडकाविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कोणी दिला? राजकीय मोदीपेक्षा आणि शेतकऱ्यांपेक्षाही देश श्रेष्ठ असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॅा. श्रीपाल सबनीस यांनी भोसरीत व्यक्त केले. 

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब आॅफ भोजापूर गोल्ड यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या यशवंत-वेणू गौरव सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या वेळी डॅा. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॅा. पी. डी. पाटील, संत साहित्याचे अभ्यासक डॅा. रामचंद्र देखणे, लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, रंगनाथ गोडगे, मुरलीधर साठे आदी उपस्थित होते. 

डॅा. सबनीस पुढे म्हणाले, "यशवंतराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर मोकळ्या झालेल्या जागेवर सर्वाथाने अधिकार यशवंतराव चव्हाणांचा होता. त्यांना तसा राजकीय अनुभवही मोठा होता. मात्र यशवंतराव चव्हाणांची पंडीत नेहरूंवर प्रचंड श्रद्धा होती. त्या श्रद्धेपोटी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डावपेच खेळून यशवंतरावांच्या इच्छेला बाजूला सारले आणि यशवंतरावांचे पंतप्रधान पद हुकले. मात्र त्याचे दुःख या मर्द मावळ्याने कधीही मानले नाही."

या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सर्वप्रथम ईबीसीची सेवा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केली. या सवलतीचा फायदा लाखो गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मिळाला."

डॅा. देखणे म्हणाले, "आज विरोधी पक्ष नेत्याचे काम म्हणजे शासनाच्या प्रत्येक कामात त्रूटी काढणे असे झाले आहे. मात्र यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते असताना त्यावेळचे माजी रेल्वे मंत्री मधुकर दंडवते यांनी रेल्वेचा अर्थ संकल्प माडंल्यानंतर पत्रकारांनी याबद्दल यशवंतराव चव्हाणांना विचारले तव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की आजच्या परिस्थितीत यासारखा चांगला अर्थसंकल्प होऊच शकणार नाही. यशवंतराव चव्हाणांची भूमिका विरोधाला विरोध म्हणून कधीच नव्हती. " 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. तर आभार अरुण इंगळे यांनी मानले. 

पुरस्कारार्थी

यशवंत-वेणू गौरव सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व त्यांच्या पत्नी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ट कवयित्री अनुराधा ठाले-पाटील यांना यशवंत-वेणू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय धावपट्टू संपदा केंदळे यांना वेणूताई चव्हाण युवती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सामाजिक कार्यकर्ते सुनील उकीर्डे यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख