विलास लांडेंचा ड्रीम प्रोजेक्‍ट महेश लांडगेंनी गुंडाळला  - Vilas Lande's dream project was canceled by Mahesh Landage | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

विलास लांडेंचा ड्रीम प्रोजेक्‍ट महेश लांडगेंनी गुंडाळला 

उत्तम कुटे 
शनिवार, 23 जानेवारी 2021

लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळातील भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट बालनगरी सध्याच्या पालिकेतील सत्ताधारी भाजपने गुंडाळून त्याठिकाणी ललित कला अकादमी उभारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शहरातील करदात्यांच्या खिशातून बालनगरीवर झालेला वीस कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे.

अगोदरच शहरात तीन संगीत कला अकादमी असताना नव्या अकादमीचा घाट कशासाठी? अशी विचारणा लांडे यांनी करीत बालनगरी प्रकल्प रद्द करू नये, या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. 

आपल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय ललित कला अकादमीचे राज्यातील केंद्र भोसरीत होत असल्याचा दावा भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. पिंपरी महापालिकेच्या ता.20 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने या बालनगरीच्या जागेवर कला अकादमी उभारण्यावर मोहोर उमटवली आहे. त्याचा सुगावा लागल्याने त्यापूर्वीच ता. 13 जानेवारी रोजी लांडे यांनी पत्र देत शहरालाच नाही, तर पुणे जिल्ह्याला भूषण ठरेल, अशी ही बालनगरी रद्द करू नये, अशी मागणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी एमआयडीसीतील या बालनगरीसाठी मोठे प्रयत्न केले होते, असे लांडे म्हणाले. मागील टर्ममध्ये राष्ट्रवादीच्या पालिकेतील सत्ताकाळात लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे या महापौर असताना बालनगरीला मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत त्यावर वीस कोटी रुपये खर्चही झाले आहेत. 

दरम्यान, बालनगरीसाठी नव्या जागेचा शोध सुरू केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महेश लांडगे यांचे समर्थक संतोष लोंढे यांनी सांगितले. मात्र, कला अकादमीला बालनगरीऐवजी दुसरी जागा देता आली नसती का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. 

बालनगरीसाठी झालेल्या बांधकामाचा कला अकादमीसाठी वापर करता येईल का हे पाहू, असे सांगत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

औद्योगिक नगरी, कामगार नगरी, ऑटो हब, आयटी सिटी, स्पोर्टस सिटी, एज्युकेशन हब आणि आता आपल्या शहराची ओळख कलानगरी व्हावी, यासाठी भोसरी व्हीजन-2020च्या माध्यमातून ललित कला अकादमीसाठी पाठपुरावा केला होता, असे महेश लांडगे म्हणाले. आता ती होणार असल्याने शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. तसेच, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ, तर नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे, असाही दावा त्यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख