पिंपरी : मावळ तालुक्यात कुसगाव प.मा. (पवन मावळ) ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुकीचा झेंडा यावेळी प्रथम रोवला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी मावळचे (जि.पुणे) राष्ट्रवादीचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी जाहीर केलेले २१ लाख रुपयांचे बक्षीस प्रथम पटकावण्याचा मान कुसगावला मिळाला आहे. दरम्यान, तालुक्यात होऊ घातलेल्या ५७ पैकी आणखी सात ग्रामपंचायतींचीही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
२१ लाखाचे बक्षीस मिळवणारे येलघोळ हे मावळातील दुसरे गाव ठरण्याची दाट शक्यता आहे.कारण तेथे सात जागांसाठी आठ अर्ज आले आहेत. तेथील सहा जागांसाठी प्रत्येकी एकेक असे सहा,तर फक्त सातव्या जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने तेथील निवडणूकही बिनविरोध झाल्यात जमा आहेत. प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले शेळकेअण्णांनी पहिल्यांदाच तालुक्यात ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावांसाठी ११ बक्षीस व इतर विविध योजनांसाठी दहा लाखांचा निधी असे २१ लाख रुपयांचे घसघशीत ईनाम देण्याची घोषणा केली.
त्यांच्या या आवाहनाला मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर व एमआयडीसी असल्याने सधन असूनही बिनविरोधचे वारे प्रथमच मोठ्या प्रमाणावर मावळ तालुक्यात घुमले आहे. कुसवली,कोथूर्णे,आंबेगाव ही गावेही २१ लाखाचे बक्षीस मिळवण्याच्या जवळपास पोचलेली आहेत.तेथे ४ तारखेला बिनविरोधचा झेंडा फडकेल,अशी चिन्हे आहेत.
मावळ तालुक्यातील १०३ पैकी ५७ ग्रामपंचायतींसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ५७ गावांतील ५१५ जागांसाठी १५८९ उमेदवारांनी १५९६ अर्ज दाखल केले असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी सरकारनामाला आज दिली. सर्वाधिक उमेदवारी अर्ज खडकाळा गावात आले आहेत.
तेथे १७ जागांसाठी ६९ उमेदवारांनी ७१ अर्ज दाखल केले आहेत. ४ तारखेला माघार आहे. तोपर्यंत आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मावळचे कारभारी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचे मन वळविण्याच्या तयारीला लागले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

