मंत्रिपद मिळविण्यासाठी नाना पटोलेंची मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका - Nana Patole criticizes allied leaders for getting ministerial post : Sunil Shelke | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिपद मिळविण्यासाठी नाना पटोलेंची मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

ज्या शहरात येऊन पटोले बोलले, तेथील नगरपरिषदेत काँग्रेस ही भाजपसोबत राहून सत्तेचा उपभोग घेत आहे.

पिंपरी  ः लोणावळा नगरपरिषदेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी अभद्र युती करणाऱ्यांनी दुसऱ्यांविषयी बोलू नये, अशी जोरदार टीका मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मंगळवारी (ता.१३ जुलै) केली. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि नेत्यांविषयी बोलण्यापूर्वी पटोलेंनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे होते व आहे, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी पटोलेंचा समाचार घेतला. महाविकास आघाडीत दरी वाढविण्याचे काम नानांनी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. (Nana Patole criticizes allied leaders for getting ministerial post : Sunil Shelke)

बेताल वक्तव्ये करीत आपल्या पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांवर प्रभाव पाडून, समाजमाध्यमांत चर्चित राहून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याचा हा प्रयत्न आहे का? असा चिमटाही शेळके यांनी काढला आहे. पक्षात वजन वाढविण्यासाठी, पक्षवाढीकरिता पटोले असे प्रयत्न करत असतील. परंतू त्यासाठी सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांवर, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरच टीका करणे, पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असे आमदार शेळके म्हणाले.

हेही वाचा : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन

पटोले यांनी नुकतीच लोणावळा येथे आघाडीतील मित्रपक्ष व त्यांच्या नेत्यांना त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडवट टीका केली होती. त्याला सडेतोड प्रत्युत्तर अजित पवार यांच्या विश्वासातील आमदार शेळके यांनी दिले. पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. माजी खासदार आहेत. एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल चुकीचे बोलणे त्यांना शोभत नाही, असे त्यांनी सुनावले. 

ज्या शहरात येऊन पटोले बोलले, तेथील नगरपरिषदेत काँग्रेस ही भाजपसोबत राहून सत्तेचा उपभोग घेत आहे. ही सत्तेसाठीची अभद्र युती अख्ख्या लोणावळाच नाही, तर मावळ तालुक्याला ज्ञात आहे. आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून भाजपसोबत लागेबांधे असणाऱ्यांच्या बाजूला बसून निष्ठावंत कार्यकर्त्यांना धडे देण्याचे काम करत आहात, या शब्दांत त्यांनी पटोलेंवर हल्लाबोल केला. 

अजित पवारांवर बोलण्यापूर्वी पटोले यांनी पुणे जिल्ह्यात, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात अजितदादांनी काय-काय विकासकामे केली आहेत, याची माहिती घेणे गरजेचे होते. अजितदादांच्या विकासकामांचा आदर्श घेऊन पटोलेंनी त्यांच्या भागात असे विकासाचे मॉडेल राबवावे, अशी कडवट सूचनही त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख