शेतातील ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये : चंद्रकांतदादांना कोल्हेंचे उत्तर  - MP Dr. Amol Kolhe criticizes Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

शेतातील ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये : चंद्रकांतदादांना कोल्हेंचे उत्तर 

उत्तम कुटे 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

दोनदा आमदार राहूनही पदवीधरांचे किती प्रश्न पाटलांनी सोडवले, हा संशोधनाचा विषय आहे.

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना शेतातील ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचाराच्या बैठकीत पिंपरी चिंचवडमध्ये डॉ. खासदार कोल्हे बोलत होते. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, उमेदवार अरुण लाड आदींसह आजी, माजी पदाधिकारी, नगरसेवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवडून येणारा एकेक आमदार महाविकास आघाडीचे सरकार मजबूत करणार आहे. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे हात बळकट करणार आहे. म्हणून याच नव्हे, तर यापुढील प्रत्येक निवडणुकीत गुलाल हा महाविकास आघाडीचाच उधळला पाहिजे, असे कोल्हे म्हणाले. 

कोल्हे यांचे आटोपशीर भाषण अधिक आवेशपूर्ण झाले. त्यांचा रोख हा पुणे पदवीधरची निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावरच होता. या मतदारसंघाचे एकदा नव्हे, तर दोनदा आमदार राहूनही पदवीधरांचे किती प्रश्न पाटलांनी सोडवले, हा संशोधनाचा विषय आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

शरद पवार यांच्यावर टीका करून चंद्रकांत पाटील यांनी आज निखारा टाकला आहे. त्याचा वणवा होणार असून त्याचा प्रत्यय याच निवडणुकीत येईल, असा इशारा अमोल कोल्हे यांनी या वेळी दिला. 

विरोधकांच्या तयारीचा कोल्हे यांनी ऐतिहासिक दाखला देत समाचार घेतला. विरोधक म्हणत आहेत की, आमची पूर्ण तयारी झाली आहे. असेच वक्तव्य अफजल खानाने केले होते. त्याचे काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे कोल्हे म्हणाले. त्यांची सत्तेची नशा विधानसभेला उतरवली आहे. आता जिथे जिथे मजबूत आहेत, असे त्यांना वाटते, तिथेही इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशाराही कोल्हे यांनी भाजपला दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख