पंढरपूरच्या आखाड्यात बाळा भेगडे-सुनील शेळके पुन्हा आमने सामने 

भारतीय जनता पक्षाला प्रतिशह दिला आहे.
 पंढरपूरच्या आखाड्यात बाळा भेगडे-सुनील शेळके पुन्हा आमने सामने 
MLA Sunil Shelke will hold a meeting for Bhagirath Bhalke's campaign in Pandharpur by-election

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रणांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 'मावळची मुलुखमैदान' तोफ अर्थात आमदार सुनील शेळके यांना 'स्टार प्रचारक' म्हणून उतरवत भारतीय जनता पक्षाला प्रतिशह दिला आहे. कारण, भाजपने माजी राज्यमंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना तेथे निवडणूक प्रमुख केले आहे. परिणामी मावळनंतर हे दोन प्रतिस्पर्धी पुन्हा पंढरपूर-मंगळवेढ्यात दीड वर्षानंतर आमने सामने आले आहेत. त्यामुळे शेळके यांचा मावळ पॅटर्न हा पंढरपूर-मंगळवेढ्यात चालणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

शेळके हे आज मावळातून पंढरपूर-मंगळवेढ्यात दाखल झाले आहेत. लगेच त्यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. ग्रामीण भागावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. उद्या त्यांचा चार गावांत गावभेट दौरा आहे. त्याजोडीने कॅार्नरसभा, मोठ्या सभा, युवक मेळावे व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीही घेणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपनेही ती प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीने भारतनानांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना, तर भाजपने समाधान आवताडे यांना तिकिट दिले आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत रंग भरले आहेत. 

भाजपने मतदारसंघाबाहेरील अनेक नेते मंडळीना प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये  बाळा भेगडे यांना निवडणूक प्रमुख केले आहे. भाजपच्या या खेळीला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. भेगडे यांना 90 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करीत संपूर्ण राज्यात 'जाएंट किलर' ठरलेल्या शेळके यांना प्रचाराकरिता मैदानात उतरविले आहे. त्यामुळे मावळकरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in