वाजपेयी म्हणाले होते, 'यह भी भेगडा, वो भी भेगडा; दोनो कर रहे है झगडा' 

नथूभाऊंच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांची तळेगावात सभा झाली होती.
Memories of Atal Bihari Vajpayee evoked by former MLAs Bala Bhegade and Ganesh Bhegade
Memories of Atal Bihari Vajpayee evoked by former MLAs Bala Bhegade and Ganesh Bhegade

पिंपरी : विधानसभेच्या 1978 च्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्‍यात नथूभाऊ भेगडे हे जनसंघाचे, तर कृष्णराव भेगडे हे एस. कॉंग्रेसचे उमेदवार होते. नथूभाऊंच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांची तळेगावात सभा झाली होती. त्यावेळी दोन्ही प्रतिस्पर्धी हे भेगडे पाहून त्यांनी आपल्या मिश्‍कील स्वभावानुसार "ये भी भेगडा, वो भी भेगडा, दोनो कर रहे है झगडा,' अशी टिपण्णी केली आणि सभेत एकच हास्यकल्लोळ झाला, अशी अटलजींची आठवण त्यांच्या जयंतीनिमित्त आज माजी राज्यमंत्री आणि मावळचे भाजपचे माजी आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी सांगितली. 

बाळा भेगडे यांच्यासह तळेगाव दाभाडे येथील भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. तळेगाव दाभाडेच नाही, तर संपूर्ण मावळ भाजपचा आतापर्यंत बालेकिल्ला होता. त्यामुळेच आणीबाणीत तळेगावसह मावळातील जनसंघाचे शेकडो कार्यकर्ते 18 महिने कारावासात होते. मावळात जनसंघाचे मोठे काम असल्याने त्यांचे व नंतर भाजपच्याही नेत्यांची तेथे वरचेवर ये-जा असे. स्वतः वाजपेयी चारवेळा तळेगावात येऊन गेले होते. जनसंघाचे 1974 चे अधिवेशन तळेगावात झाले, तेव्हा अटलजी पहिल्यांदा आले होते, असे गणेश भेगडे यांनी सांगितले. 

त्यानंतर 1978 च्या विधानसभा निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार असलेले भेगडे यांचा किस्सा बाळा भेगडे यांनी ऐकवला. 1978 ची ही अटलजींची दुसरी तळेगाव भेट होती. त्यानंतर 1980 मध्ये शहरात येऊन त्यांनी भाजपची स्थापना केली. त्यावेळी ते रेल्वेने आले. घोरावडेश्वर स्टेशनवर उतरून तेथून मोटारीने ते तळेगावात आले होते. जंगी मिरवणुकीनंतर त्यांनी शहरात भाजपची स्थापना व शहर कार्यालयाचे उदघाटन केले होते. चौथी आणि शेवटची अटलजींची भेट ही 1986-87 ची होती. त्यावेळी राज्यात फक्त डोंबिवली आणि तळेगाव या दोनच नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता होती. 

तळेगाव नगरपलिका तर सलग 33 वर्षे पक्षाने ताब्यात ठेवली होती. त्यानिमित्त ते शहरात आले होते. बाळा भेगडे यांचे वडील विश्वनाथराव भेगडे त्यावेळी नगराध्यक्ष होते. त्यांचा अटलजींनी सत्कार केला. नंतर त्यांच्याच पडवीवजा घरात भाजी भाकरी खाऊन ते पुढे गेले होते. त्यापूर्वी त्यांनी कुटुंबातील सर्वांची व त्यातही लहाना मुलांना जवळ घेऊन विचारपूस केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com