घुसमट होऊ लागल्याने राष्ट्रवादी सोडली : महेश लांडगेंचे पक्षांतरावर प्रथमच भाष्य 

राष्ट्रवादीत थांबायच्या मनस्थितीत होतो. पण, नाईलाज झाला...
घुसमट होऊ लागल्याने राष्ट्रवादी सोडली : महेश लांडगेंचे पक्षांतरावर प्रथमच भाष्य 
Mahesh Landage explained the reason for leaving the NCP

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घुसमट होऊ लागल्याने आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा गौप्यस्फोट भोसरीचे आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी प्रथमच केला. 

भोसरी मतदारसंघातील मोशी येथे राष्ट्रवादीचे संघटक, माजी नगरसेवक आणि कामगार नेते अरुण बोराडे यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण सांगितले. राष्ट्रवादीत थांबायच्या मनस्थितीत होतो. पण, नाईलाज झाला आणि अखेर पक्ष सोडावा लागला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. 

पक्षातील काही नेत्यांचे विचार न पटल्याने व त्यातून घुसमट अधिक होऊ लागल्याने राष्ट्रवादी सोडल्याचे महेश लांडगे यांनी सांगितले. त्यामुळे हा अथवा हे नेते कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अराजकीय कार्यक्रमात महेश लांडगे यांनी आपल्या पक्षांतराचे गूढ उलगडले हे विशेष. 

या कार्यक्रमाला साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश लांगडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह अनेक नगरसेवक अशी राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. आपला मुख्य प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष राष्ट्रवादीचे पदाधिकारी बोराडे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून लांडगे यांनी आपल्या पॉलिटिक्‍स विथ रिसपेक्‍टचा पुन्हा प्रत्यय दिला. 

बोराडे यांच्या "माय माझी इंद्रायणी' (कवितासंग्रह) आणि वेध सामाजिक जाणिवांचा (व्यक्तीचित्रण) या पुस्तकांचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी खूप आग्रह झाल्यानंतर केलेल्या शुभेच्छापर भाषणात महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागील गुपित फोडले. 

ते म्हणाले, "पक्ष सोडण्यापूर्वी अरुणभाऊंच्या (बोराडे) संपर्कात होतो. त्यांनी "पक्षातील काही नेत्यांचे विचार पटत नसले, तरी मी पक्षात आहे, असे सांगत दादा, तुम्ही विचार बदला, पक्ष सोडू नका,' असे सांगितले होते. पण, "तुम्ही थांबा, मला एवढा अनुभव बास झाला,' असे सांगत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.'' 

सबनीस यांचे परखड, स्प्षट भाषण प्रत्यक्ष ऐकल्यानंतर तिथून पुढे तोलूनमापून बोलायचे ठरवले, असा दुसरा गौप्यस्फोटही लांडगे यांनी या वेळी केला. त्याबाबत ते म्हणाले, पिंपरीत 2016 च्या जानेवारीत 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यात सबनीस यांचे स्पष्ट आणि परखड भाषण प्रत्यक्ष ऐकले.

त्यानंतर त्याचे काही दिवस उमटलेले पडसादसुद्धा पाहिले आणि त्यानंतर बिनधास्त, परखड आणि स्पष्ट बोलण्याच्या आपल्या सवयीला लगाम घालायचे, असे मी ठरवले. तोलूनमापून बोलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इथेही तोलूनमापून बोलणार आहे. तसे बोलायचे खूप होते. पण, ते इथे मॅच होणार नाही. कारण एखादा चुकीचा शब्द निघाला, तरी त्याचा काहीही अर्थ काढला जातो. त्यात साहित्य व माझा दूरवर काहीही संबंध नाही. त्यामुळे काही चुकले असल्यास माफ करावे, असे ते म्हणताच उपस्थितांनी त्याला हसून दाद दिली. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in